गुहागर : येथील चौपाटीवर जलसफरीचा आनंद घेताना पाण्यात अडकलेल्या आठ पर्यटकांचा जीव वाचणार्या गुहागर नगरपंचायतीचा जीवरक्षक प्रदेश तांडेल याचा आज जीवनश्री प्रतिष्ठान व प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या दोन संस्थेच्या वतीने गुहागर रंगमंदिर येथे आज दुपारी ४ वाजता विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
निसर्गसौंदर्याने नटलेल्या गुहागर चौपाटीवर डिसेंबर अखेरीस मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित स्नान करता यावे याकरिता गुहागर नगरपंचायतीने किनाऱ्यावर जीवरक्षक नेमले आहेत. रविवारी समुद्रात जलसफरीचा आनंद घेताना पाण्यात अडकलेल्या आठ पर्यटकांना प्रदेश तांडेल याने आपल्या रेस्क्यू बोर्डच्या साह्याने किनाऱ्यावर सुखरूप परत आणले होते. त्याच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. याची दखल सामाजिक कार्यात काम करणाऱ्या जीवनश्री प्रतिष्ठान व प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय गुहागर या संस्थांनी घेतली असून त्याचा प्रोत्साहनपर सत्कार करणार आहेत.
प्रदेशाने आतापर्यंत समुद्रात बुडताना अनेकांचे प्राण वाचविले आहेत. किनाऱ्यावरील पर्यटकांना जलसफरीचा आनंद देणाऱ्या गुहागर ऍडव्हेंचर स्पोर्टमध्ये गेली ४ वर्षे काम करताना समुद्रात स्नान करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडणाऱ्या पर्यटकांना त्याने जीवदान देण्याचे काम केले आहे. बुडालेल्या व्यक्तींचे मृतदेह अंजनवेल किंवा रानवी किनाऱ्यावरील खडकावर आढळून आल्यास हे मृतदेह गुहागर किनाऱ्यावर आणण्यासाठी गुहागर पोलिसांना प्रदेश तांडेल जेट्सकीच्या सहाय्याने आणून देण्याचे काम करतो. पोहण्याचे उत्तम प्रशिक्षण घेतले असून गेल्या वर्षभरापासून गुहागर नगरपंचायतीमध्ये जीवरक्षक किनाऱ्यावर सेवा बजावत आहे.
प्रदेश हा उत्कृष्ट डान्स कलाकार आहे. असगोली येथील मत्स्यगंधा ग्रुपच्या माध्यमातून त्याने ग्रुपला तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर यश संपादन करून दिले आहे. प्रदेश जसा आपले काम म्हणून बुडणाऱ्याचे प्राण वाचविण्यासाठी धाऊन जातो तसा तो त्याच्या आयुष्यातही प्रत्येकाच्या सुखदुःखात नेहमीच पुढे असतो.