गिमवी येथील प्रकार; वीज महावितरणचा अनागोंदी कारभार
गुहागर : वीज मीटर बंद असूनही ग्राहकाला वीज बिल आल्याची तक्रार गुहागर तालुक्यातील येथील अरुण वामन जाधव यांनी गुहागर वीज महावितरणकडे केली आहे. मात्र अद्यापहि त्यांच्या तक्रार अर्जाकडे एकही अधिकाऱ्याने लक्ष दिलेले नाही.
लॉकडाऊन काळात आलेल्या भरमसाठ वीज बिलामुळे आदिच चर्चेत असलेल्या वीज महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. वीज मीटर बंद असताना ग्राहकांना बिले कसे काय येतात, असा सवाल उपस्थित होत आहे. येथील अरुण जाधव यांच्या मीटर क्रमांक ५८०४६५६५७४ हा ४ मे २०१८ ते १५ मार्च २०१९ पर्यंत बंद होता. गेले वर्षभर त्यांची वीज बंद होती. तरीही वीज बिल आले व त्यांनी ते भरले. बिले कमी करून मिळावे, अशी त्यांची मागणी होती. याबाबत त्यांनी सलग तीनवेळा अर्ज विनंत्या गुहागर महावितरणकडे केल्या होत्या. मात्र अद्याप त्यांच्या मागणीकडे येथील अधिकार्यांनी लक्ष दिलेले नाही. वीज ग्राहकांची होणारी फरपट महावितरणने थांबवावी व वीज बिल कमी करून मिळावीत अशी विनंती त्यांनी केली आहे.