गुहागर : पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. आठवडा बाजारात ११ व्यक्तींकडून दंडापोटी ५ हजार ५०० रुपयांची वसुली केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने येथील शनिवारचा आठवडा बाजार काही अटी व शर्तींच्या नियमानुसार सुरू केला आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात पुन्हा एकदा कोरोनाची लागण होऊ नये यासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व कर्मचारी यांनी विशेष लक्ष दिले आहे. बाजारपेठेतून विना मास्क फिरणाऱ्यांना सूचना तर दुसऱ्या बाजूला कारवाई सुरू केली आहे. शिवाय आठवडा बाजारात खरेदीसाठी पंचक्रोशीतून येणारे नागरिक विना मास्क असतील तर त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली आहे. आठवडा बाजारातील ११ जणांवर कारवाई करत दंडात्मक वसुली केली आहे. या कारवाईमुळे बाजारपेठेत मास्क शिवाय कोणी फिरताना दिसत नाही. कोरोना विरोधातील लढाईत नागरिकांनी पहिल्यापासून ज्याप्रमाणे ग्रामपंचायतीला सहकार्य केले तसे सहकार्य यापुढेही मिळावे, असे आवाहन सरपंच संजय पवार यांनी केले आहे.