खात्याचे दुर्लक्ष; अपघाताच्या घटना
गुहागर : गुहागर – वेलदुर मार्गावरील वरचापाट येथे पडलेल्या खड्ड्यांमुळे सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. गेली अनेक महिने पडलेले खड्डे दिसूनही संबंधित खाते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.
मोडकाआगर येथील पुलाच्या कामामुळे खाजगी वाहनांसह एसटीच्या बसफेऱ्या गुहागर -वेलदुर मार्गावरून जात असतात. यामुळे या मार्गावर वाहनांची सतत ये-जा सुरु असते. आधीच वरचापाट रस्ता अरुंद असल्याने यादरम्यान मोठे वाहन आल्यास चालकाला समोरील वाहनांना बाजू देताना मोठी कसरत करावी लागते. इथे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अनेक वेळा वादाचे प्रसंग घडत असतात. या मार्गावर दोन ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. गेले अनेक महिने हे खड्डे आहेत तसेच आहेत. खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रसंग घडत असतात. पडलेले खड्डे बुजवण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, संबंधित खात्याला कधी जाग येते हे लवकरच दिसून येणार आहे.