गुहागर : विद्यार्थी प्रिय शिक्षक आणि कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख पांडुरंग गौरू भायनाक (गुरुजी) यांचे मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने चिपळूण येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना निधन झाले. मृत्यूसमयी ते ५७ वर्षांचे होते.
पांडुरंग भायनाक यांचे मूळ गाव पालशेत असले तरी ते गेल्या काही वर्षांपूर्वी गुहागर खालचापाट येथे स्थायिक झाले आहेत. शिक्षिकीपेक्षा उत्तमप्रकारे संभाळल्यानंतर गेली अनेक वर्षे ते केंद्रप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. सध्या गुहागर व पवारसाखरी केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत होते. शिक्षणाबरोबरच विद्यार्थी क्रीडा क्षेत्रातही पुढे गेला पाहिजे, यासाठी त्यांचे प्रयत्न असायचे. शाळेच्या विविध उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता. भायनाक हे अखिल प्राथमिक शिक्षण संघटना गुहागर शाखेचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत होते. अत्यंत शांत, हसतमुख, दिलखुलास, उत्साही, मनमिळावू आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे भायनाक गुरुजी यांचे व्यक्तिमत्व होते. मंगळवारी त्यांची प्रकृती बिघडल्याने चिपळूण येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याच वेळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबासह शिक्षक, मित्र परिवार, विद्यार्थी यांना मोठा धक्का बसला आहे.
कै. भायनाक हे पुढील आठ महिन्यात शिक्षकी सेवेतून निवृत्त होणार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. बुधवारी सकाळी १० वाजता गुहागर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वच क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.