सोबत पोलीस असल्याने आज सर्वाधिक दंडवसुली
गुहागर, ता. 23 : येथील नगरपंचायतीने आज मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईचा फटका तरुण, तरुणी आणि काही पर्यटकांनाही बसला. दिवसभरात 16 व्यक्तींकडून दंडापोटी 8 हजार रुपयांची वसुली नगरपंचायतीने केली. गेल्या सहा महिन्यात नगरपंचायतीने 44 मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करून 22 हजार रुपयांचा महसूल गोळा केला आहे.
सोमवारी गुहागरमध्ये प्रशासकीय कामासाठी तालुक्यातून येणार्या लोकांची संख्या अधिक असते. त्यामुळे आज अचानक गुहागर नगरपंचायतीने दंडात्मक कारवाईसाठी बाजारपेठेत टीम पाठवली. या टिममध्ये गुहागर नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी महेंद्र पेढामकर, नगरपंचायत कर्मचारी सुनील नवजेकर, ओंकार लोखंडे सहभागी झाले होते. केवळ नगरपंचायतीचे कर्मचारी कारवाईसाठी उभे राहिले की, स्थानिक लोक वाद घालतात. त्यामुळे या कारवाईचे वेळी एक पोलीस शिपाई द्यावा अशी मागणी नगरपंचायतीने गुहागर पोलीस ठाण्याकडे केली होती. ती मागणी मान्य करत पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी नगरपंचायतीच्या टीमला सहकार्य करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल वागतकर यांची नियुक्ती केली. पंचायत समिती कार्यालय, बाजारपेठ, एस.टी. बसस्थानक आदी .ठिकाणी उभे राहून मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीला पकडून दंड वसूल करण्याचे काम ही टीम करीत होती. सोबत पोलीस असल्याचे परिणाम आज पहायला मिळाला. आजपर्यंत नगरपंचायतीच्या टिमला न जुमानता लोक पळून जात असतं. मात्र आज पोलीस असल्याने 16 व्यक्तींकडून 8 हजार रुपयांचा दंड या टीमने वसूल केला.
या कारवाई संदर्भात बोलताना महेंद्र पेढामकर म्हणाले की, पर्यटकांवर कारवाई करताना दु:ख झाले. कारण पर्यटक फिरायला येतात. समुद्रस्नानासाठी जाताना मास्क घेऊन जात नाहीत. काही पर्यटकांना आम्ही मास्क वापरा अशी सूचना केली. कारण गुहागरमध्ये पर्यटन व्यवसाय वाढला पाहिजे ही आमचीही इच्छा आहे. इथे आलेला पर्यटक केवळ कारवाईची आठवण ठेवून गेलेला आम्हांलाही चालणार नाही. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनीच पर्यटकांना मास्क वापरण्यासंदर्भात आग्रहाची विनंती केली तर अधिक चांगले होईल. गुहागरमध्ये पुन्हा कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी सर्वांनीच सहकार्य केले तर अशी कारवाई करावी लागणार नाही.