हेदवी येथील सभेत निर्णय
गुहागर : ओबीसी संघर्ष समन्वय समिती गुहागर कार्यकारणीची सभा हेदवी येथील जुवेवाडी सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी पांडुरंग पाते हे होते. सचिव निलेश सुर्वे यांनी सभेपुढील विषयांचे वाचन केले तसेच मागील आंदोलनांचा आढावा घेतला. ओबीसी मध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व जातींची ही संघटना असून ओबीसी आरक्षण वाचविणे व जातनिहाय जनगणना होण्यासाठी पाठपुरावा करणे, असा या संघटनेचा प्रमुख उद्देश आहे.
या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, तहसीलदार कार्यालयावर मोर्चा, मुंबईत गोलमेज परिषद असे कार्यक्रम पार पडले आहेत.ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी तळागाळातील घटकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तालुका कार्यकारिणी बरोबर प्रत्येक जिल्हा परिषदेच्या गटात उपसमिती नेमली जाणार आहे. तालुका व जिल्हा परिषद गटनिहाय समितीच्या माध्यमातून आरक्षण व जनगणना यांसारख्या विषयांबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. त्यासाठी माहिती पत्रकाचे वाटप करण्यात येणार आहे. ओबीसी संघर्ष समन्वय समिती राजकारणापासून दूर राहून ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देणार आहे. ओबीसी मधील सर्व समाज घटकांनी आपल्या भावी पिढीसाठी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन तालुका संघर्ष समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी अध्यक्ष पांडुरंग पाते, सचिव निलेश सुर्वे, उपाध्यक्ष अरविंद पालकर, चंद्रकांत पागडे, दत्ताराम निकम, शशिकांत पवार, संतोष जैतापकर, तुकाराम निवाते, अजित साळवी, नवनीत ठाकूर, वैभव आदवडे, नरेश निमुणकर, संजय पवार, वासुदेव पांचाळ, अमोल पवार, संतोष मोरे,संतोष सोलकर यांसह तालुका कार्यकारणी चे सर्व पदाधिकारी व व सदस्य उपस्थित होते. सचिव निलेश सुर्वे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.