गुहागर : शहरातील बाजारपेठेत गुरुवारचा आठवडा बाजार आज दि. १९ पासून पुन्हा सुरू झाला आहे. सर्व अटी व शर्तींचे पालन करूनच येथील आठवडा बाजार गुहागर शहरवासीयांसाठी खुला झाला आहे. कोरोना प्रादुर्भावानंतर आठ महिन्यांनी सुरू झालेल्या पहिल्याच आठवडा बाजारात ग्राहकांनी गर्दी केली होती.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेली सात ते आठ महिने आठवडा बाजार बंद होता. रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शृंगारतळी बाजारपेठेत सापडल्यानंतर शृंगारतळी पाठोपाठ गुहागर शहरात सुरू असलेला गुरुवारचा आठवडा बाजार देखील बंद करण्यात आला होता. दरम्यान, सध्या तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शहरातील आठवडा बाजार सर्व अटी व शर्थीचे पालन करून शहरवासियांसाठी पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे.