नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांचे सुतोवाच
गुहागर : नगराध्यक्ष राजेश बेंडल हे पुन्हा राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाले आहेत. सक्रिय म्हणण्यापेक्षा ते आधीपासूनच सक्रिय होते. राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होण्याची प्रक्रिया वरिष्ठ पातळीवर पूर्ण झाल्यानंतर ते तालुक्यात अधिक जोमाने काम करतील, असा विश्वास आम्हाला आहे. त्यामुळे भविष्यात गुहागर नगरपंचायत सुद्धा राष्ट्रवादीची झालेली असेल,यात कोणतीच शंका नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांनी गुहागर न्यूजशी बोलताना व्यक्त केली. तसेच तालुक्यातसह संपूर्ण विधानसभा मतदारसंघात पुन्हा नव्या जोमाने संघटना बांधणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. आरेकर म्हणाले की, गेले वर्षभर गुहागर तालुक्याला अध्यक्ष पद नव्हते. या आधी रामचंद्र हुमणे यांनी चांगल्या प्रकारचे काम केले आहे. पण त्यांच्या आजारपणामुळे ते पक्षाकडे लक्ष देऊ शकले नाहीत. आता पक्षाने तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे ती व्यवस्थित निभावण्या करता मी जास्त जास्त प्रयत्नशील राहीन, असे त्यांनी सांगितले.
लोकांपर्यंत पोहोचणे, प्रत्येक गावाच्या विकासासाठी प्रयत्न करत राहणार आहे. गुहागर तालुक्यातील किंवा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी खिळखिळी झालेली नाही तर ती येत्या काळात अधिक बळकट झालेली पाहायला मिळले, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काही कारणास्तव पक्षापासून दुरावलेली चांगली लोक पुन्हा आपल्या पक्षात येत आहेत व पक्षांमध्ये पुन्हा प्रवेश करत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादीवर विश्वास दाखविला म्हणून त्या निवडणुकीत पक्षाला ५३ हजार मते मिळाली. आमदार भास्करराव जाधव राष्ट्रवादी सोडून गेले तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस जिवंत असण्याचा हे एक मोठे उदाहरण आहे, असेच म्हणावे लागेल. पक्षाची नवीन दिशा ठरवताना आमचा फोकस हा युवकांवर आहे. युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, त्यांना उद्योगधंद्याकडे वळवणे, शेतीकडे वळणे की, ज्या माध्यमातून युवा पिढी ही आपल्या पक्षाकडे खेचली जाईल. राष्ट्रवादी आपल्या दारी हा संकल्प घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो आहे. प्रत्येक जि. प. गट व पं. स. गणानुसार आमच्या बैठका सुरू झाल्या आहेत. आणि प्रत्येकाच्या घरात पोहोचून तळागाळातील विकास कमी करण्यावर भर देणे हे आमचे कर्तव्य असेल असे सांगतानाच आता तर गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल हे राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाले आहेत. यापूर्वी त्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार सहदेव बेटकर यांचे चांगले काम केले होते. ते पक्षापासून कधी दूर झाले नव्हते. फक्त प्रश्न राहिला आहे तो नगरपंचायतीचा. ज्यावेळी नगरपंचायत निवडणूक लढवली, त्यावेळी शहर विकास आघाडी तयार केली होती. आणि आघाडीमध्ये सगळ्या पक्षाची माणसे होती. त्यांच्या माध्यमातून नगरपंचायतमध्ये शहर विकास आघाडीची सत्ता आहे. पण राजेश बेंडल यांचे मत आहे की, हे सगळे प्रश्न आम्ही वरिष्ठ सोबत बसून सोडणार आहोत. त्यामुळे भविष्यात गुहागर नगरपंचायत राष्ट्रवादीची होणार यामध्ये कुठलीही शंका नाही.
इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप बेंडल यांच्या बाबत विचारले असता श्री. आरेकर म्हणाले प्रदीप बेंडल यांच्या प्रवेशाने पक्षाला नक्कीच फायदा होईल. कारण सामाजिक स्तरावर त्यांना मोठा मान आहे. याचा फायदा राष्ट्रवादीला होईल. काँग्रेस मध्ये काम करताना ते तळागाळात पोहोचले होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाल्यानंतर पक्ष उभारणीला मोठा हातभार लागेल असे त्यांनी सांगितले.