तालुक्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा – सुनिल पवार
गुहागर : तालुक्यातील नुकसान झालेल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती पोहोचावी यासाठी कृषी विभागाच्या वतीने पीक विम्याची गावोगावी फिरून माहिती सांगणाऱ्या रथाचा शुभारंभ पाटपन्हाळे कोंडवाडी येथे पंचायत समिती उपसभापती सुनिल पवार यांच्या हस्ते फित व श्रीफळ वाढवून करण्यात आला.
अवकाळी पाऊस, गारपीट, कमी व जास्त तापमानामुळे शेतीची दरवर्षी मोठी नुकसानी होत असते. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना आणली आहे. या योजनेचा प्रसार व प्रचार करण्यासाठी रथ तयार करण्यात आला आहे. या रथाचा शुभारंभ उपसभापती पवार यांच्या हस्ते झाल्यानंतर या योजनेची माहिती पाटणे कोंडवाडीतील शेतकरी यांना देण्यात आली. या नैसर्गिक संकटातून बाहेर येण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना खरोखरच त्यांना आधार देणारी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपसभापती श्री. पवार यांनी शेतकऱ्यांना केले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी रोहन चोथे, कृषी पर्यवेक्षक श्री. बी. एस. कोळी पाटपन्हाळे ग्रामपंचायत सदस्य अमरनाथ मोहिते, महेंद्र गावडे, शिवसेना विभाग प्रमुख अनंत चव्हाण, दिनेश चव्हाण, शेतकरी तुकाराम तेलगडे, गणपत पागडे महेंद्र गावडे, अंकुश तेलगडे, तेजस तेलगडे, अमित तेलगडे, संजय पागडे, अक्षय तेलगडे, विपुल रावणंग, वसंत तेलगडे, रामचंद्र तेलगडे, बबन तेलगडे, यशवंत तेलगडे, गंगा तेलगडे, शांताराम भेकरे, रुपेश तेलगडे, आदित्य तेलगडे, आदिती तेलगडे, तुकाराम तेलगडे, सुनील गावडे आदींसह अन्य शेतकरी उपस्थित होते.