‘बाळू मामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेतून पदार्पण
गुहागर : तालुक्यातील आबलोली खालील पागडेवाडी येथील युवा कलाकार संतोष फटकरे याने कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बाळू मामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. त्याबद्दल त्याचे आबलोली पंचक्रोशीतून अभिनंदन करण्यात येत आहे.
आबलोली खालील पागडेवाडी विकास मंडळाच्या नमन कलेच्या माध्यमातून वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांनी आपल्या अभिनय कलेचा श्रीगणेशा केला. नमनातील विविध पात्रे अत्यंत प्रभावीपणे साकारली.त्यापैकी स्त्री वेशातील राधा गवळण ही व्यक्तिरेखा रसिकांच्या मनावर कोरली गेली आहे.नमनातील गणेश वंदना,गवळण,वगनाट्य, विनोदी फार्स आदी प्रकारात त्याने अनेक भूमिका साकारल्या आणि गाजवल्या सुद्धा. नमना बरोबरच त्याने अनेक छोटी मोठी नाटके सुद्धा केली.कुणबी युवा गुहागर कलामंच मुंबई यांच्या ‘जिंकू या दाही दिशा’ या नाटकांमध्ये सुभाष गोताड यांच्या मार्गदर्शनाखाली संतोषने महत्वाची भूमिका साकारली. तसेच अनेक विविध भूमिकांच्या माध्यमातून कलेला आकार देण्याचे काम सुभाष गोताड यांनी केल्याचे संतोष फटकरे यांनी सांगितले.’बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत एका गावकरी माणसाची भूमिका त्याने साकारली.आपले सहकारी मित्र आदेश घडवले यांच्या सहकार्याने त्याला ही भूमिका मिळाल्याचे त्याने कृतज्ञतापूर्वक नमूद केले. मालिकेतील हा गावकरी समंजस आणि प्राण्यांविषयी भूतदया बाळगणारा आहे.प्रभावी संवाद आणि अभिनयाने त्यातही संतोषने आपली छाप सोडली आहे. या अभिनय क्षेत्रात येताना आपल्या स्थानिक विकास मंडळाचे, कुणबी युवा गुहागर यांचे तसेच कै. सखाराम गोणबरे आणि सहकलाकार यांचे मोलाचे मार्गदर्शन, सहकार्य लाभल्याचे कृतज्ञतापूर्वक नमूद केले.या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणाऱ्या संतोष फटकरे आगामी काळात अनेक मालिकेतून,नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स वाहिनीवरील मालिका पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.आपल्या गावातील आणि परिसरातील प्रेक्षकांप्रती, हितचिंतकांप्रती संतोष फटकरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.