गुहागर : पालशेत येथील दर्यावर्दी प्रतिष्ठानची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या सभेत पांडुरंग दाभोळकर यांनाच पुन्हा एकदा सर्वानुमते संस्थेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. तसेच आगामी पाच वर्षासाठी संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे दर्यावर्दी प्रतिष्ठान आता राज्यस्तरावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला. संस्थेचे पुढील पाच वर्षांमध्ये स्वमालकीची इमारत आणि क्रीडागंण निर्मितीचे ध्येय गाठण्याचे निश्चित केले आहे.
[bsa_pro_ad_space id=1]
दर्यावर्दी प्रतिष्ठानचे २१ वर्षे अहोरात्र काम करणारे पांडुरंग दाभोळकर यांनाच पुन्हा एकदा सर्वानुमते संस्थेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. तर पांडुरंग दाभोळकर यांच्यासोबत काम करणारे गुरुनाथ जाक्कर यांच्यावर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आदर्श शिक्षक पुरस्काराबरोबरच राज्य आणि राष्ट्रस्तरावरील विविध पुरस्कार विजेते आणि रा.स्व. संघ जनकल्याण समितीचे कार्यकर्ते असलेले शिक्षक दिनेश जाक्कर यांची सचिव पदी, प्रविण बेंदरकर यांची सहसचिव पदी तर खजिनदार पदी संतोष आगडे यांची निवड करण्यात आली आहे. दर्यावर्दी प्रतिष्ठानचे संचालक म्हणून भगवान शंकर पाटील, संतोष जनार्दन पावरी, निलेश शंकर पाटील, भिकाजी धोंडू पालशेतकर, सुरेश गौरू पालशेतकर, वसंत तुकाराम पाटील, लक्ष्मण सखाराम पटेकर, सौ. स्नेहल संतोष पावरी, सौ. मेघा निलेश पाटील, सौ. गुंतता गुरुनाथ जाक्कर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या सर्वसाधारण सभेत पदाधिकाऱ्यांच्या निवडीबरोबरच दोन महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. दर्यावर्दी प्रतिष्ठान गेली २० वर्ष (२००१ पासून) पालशेत पंचक्रोशी भागात कार्यरत आहे. या संस्थेचे कार्यक्षेत्राचा भौगोलिक विस्तार करण्यात आला आहे. यापुढे महाराष्ट्र राज्यात दर्यावर्दी प्रतिष्ठान काम करणार आहे. असा ठराव सभेत बिनविरोध मंजूर करण्यात आला. आगामी ५ वर्षांच्या या कालावधीत संस्थेच्या बहुउद्देशीय इमारतीची उभारणी आणि सुसज्ज क्रीडांगणाची निर्मिती करण्याचा संकल्प संस्थेने सोडला आहे.