(खालील लेख लिहिण्यासाठी मौलाना समीर बोट, गुहागर टाईम्सचे संपादक निसार खान यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल गुहागर न्यूज आभारी आहे. धन्यवाद.)
आज (ता. 28) पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन. खरतरं दरवर्षी या दिवशी शृंगारतळी बाजारपेठ सजते. मिरवणुक होते. गुहागर तालुक्यातील मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने मोहम्मद सल्लाला हुआलैही मस्सलम पैगंबर म्हणजे पैगंबर हजरत मोहम्मद यांचा वाढदिवस साजरा करतात. परंतु यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने तालुक्यातील मुस्लिम धर्मियांनी 12 रबिऊलअव्वल म्हणजेच ईद ए मिलाद हा दिवस साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. याच दिवशी पैगंबर हजरत मोहम्मद यांचे निधन झाले असेही सांगितले जाते. जन्मदिवस आणि मृत्युदिवस एक असल्याने या दिवसाला मुस्लिम धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.
मोहम्मद सल्लाला हुआलैही मस्सलम पैगंबर यांनी आपल्या आचरणातून दिलेली शिकवण आणि काय करावे, काय करु नये या गोष्टी सांगितल्या त्याला हदिस असे म्हटले जाते. ईद ए मिलादच्या दिवशी हदिसचे वाचन करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पैगंबर हजरत मोहम्मद यांनी दिलेल्या शिकवणीमधील काही मुद्दे इथे विषद करत आहे. आईवडीलांनी आपल्या मुलांचे संगोपन केले पाहिजे. त्याच्यावर चांगले संस्कार केले पाहिजेत. तसेच मुलांनीही आपल्या आईवडीलांचा आदर केला पाहिजे. सांभाळ केला पाहिजे. आपल्या नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये प्रेमाचे नाते निर्माण केले पाहिजे. (खानदानी निजाम की बुनियाद उन्होंने रखी). आपल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांजवळ प्रेमाने वागण्याची शिकवण त्यांनी दिली. पैगंबर हजरत मोहम्मद साहेब असे सांगायचे की, आपल्या घराची उंची देखील शेजाऱ्याच्या घरापेक्षा उंच असू नये. आपल्या शेजारी रहाणारे कुटुंब गरीब असेल तर आपल्या अन्नातील वाटा त्याला द्या. त्या कुटुंबाला आपला आधार वाटला पाहिजे इतकी काळजी करा. (जुल्म से मना किया, अद्ल इन्साफ का हुक्म दिया) माणसाने आपल्या मनातील वाईट विचार काढून टाकून चांगल्या विचार मनात रुजविले पाहिजेत. (बुरी हसलतोंको अच्छी आदात मे बदल दिया ।) गोरगरीबांना मदत करण्यास, आजारी लोकांची सेवा रण्यास पैगंबर हजरत मोहम्मद साहेबांनी सांगितले. प्रत्येकाचा हक्क अबाधित ठेवा. (अक्कलीयत के हुकुक को बाकी रखना )
इमानदारीने व्यवसाय करण्याची शिकवण त्यांनी दिली. त्यांच्याबद्दल एक किस्सा सांगितला जातो. हजरते खतिजा नावाच्या एका महिलेने व्यापारासाठी काही माल पैगंबर हजरत मोहम्मद यांच्याकडे दिला. सुमारे 200 मैल प्रवास करुन त्यांनी हा माल संपविला. त्यानंतर मोहम्मद साहेब त्या महिलेकडे आले. तेव्हा त्यांनी तो माल विकून आलेले सर्व पैसे हजरते खतिजा यांच्याकडे सोपवले. (प्रवासभत्ता, खाण्या पिण्याचा खर्च त्यांनी स्वत:च्य खिशातून केला.) इतक्या प्रामाणिकपणे व्यापार उदीम केला पाहिजे. असा त्यांचा आग्रह होता. चोरी, डाका, धोका देना, कत्ल, जिना (अनैतिक संबंध) ऐसी बुरी आदत का सद्देबाप करो. म्हणजेच या सर्व गोष्टींसाठी तुमच्या मनाचे दरवाजे कायम बंद राहीले पाहिजेत. असे ते सांगत. महिलांवर होणारा अत्याचार त्यांना मान्य नाही.
पैगंबर हजरत मोहम्मद म्हणजे खरचं अल्लाचा अवतार आहेत का हे पहाण्यासाठी एका यहुदी महिलेने परीक्षा घेतली. त्यांना आपल्या घरी जेवायला बोलावले. त्यांच्या आवडीचे भोजन बनवले. जर मोहम्मद साहेब अल्लाचा अवतार असतील तर त्यांना भोजनात टाकलेले विष समजेल. असा विचार करुन भोजनात विष कालवले. प्रत्यक्ष मोहम्मद साहेब जेवायला बसले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपल्या भोजनात विष आहे. मात्र या घटनेमुळे ते चिडले नाहीत. रागावले नाहीत. भोजनावरुन उठून गेले नाहीत. हा महिलेनेच आपण भोजनात विष कालवल्याची माहिती मौहम्मद पैगंबरांना दिली. ते विष त्यांनी पचविले. तेव्हा ती महिलाही मोहम्मदसाहेबांची भक्त बनली. अशा पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जीवनात घडलेल्या कथा, त्यांनी सांगितलेली शिकवण यांची आठवण ईद ए मिलादच्या निमित्ताने मुस्लिम बांधव करतात. लहान मुलांना त्यांच्या कार्याची माहिती सांगितली जाते.