गुहागर : साडेतिन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला दसरा, विजयादशमीचा दिवशी अनेकांनी नव्या उद्योग, व्यवसायांना सुरवात केली आहे. कोरोनामुळे आठ महिने ठप्प असलेल्या आर्थिक घडीच्या पार्श्वभुमीवर झालेले उद्घाटन सोहळे आम्ही पुन्हा उभे रहाणार हाच विश्र्वास दर्शवितात.
[bsa_pro_ad_space id=3]
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर एस.टी. स्टॅण्ड परिसरात प्रसाद लोखंडे यांनी मिनी सुपर मार्केट सुरु केले आहे. तर वरचापाट येथील मयुरेश साखरकर यांनी अंजनवेल फाटा येथे श्री स्वामी समर्थ क्वालिटी बेकरीचा शुभारंभ दसऱ्याला केला. धोपावेतील कृपा हेअर टॉनिकचे मालक राजन दळी यांची सून डॉ. प्रिती वैभव दळी यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर डे केअर क्लिनिक सुरु केले आहे. हे डे केअर क्लिनिक एस.टी.स्टॅण्ड परिसरात धवल मेडिकलच्या मागे आहे. गुहागर शहरातील बसस्थानकासमोर फोटोग्राफर पवन विखारे याच्या पवनस्टाईल फोटोग्राफी या नव्या दालनाचा शुभारंभ आजी श्रीमती शुभांगी विखारे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. पवन विखारे आपल्या नव्या व्यवसायातून पर्सनल फोटोशूट, फ्री वेडिंग फोटोशूट, वेडिंग फोटोशूट एंगेजमेंट फोटोशूट, किड्स फोटोशूट तसेच वेगवेगळ्या प्रकारचे फोटो अल्बम व विविध कार्यक्रमाचे फोटोशूट करून देण्याच्या सेवा देणार आहेत.
गुहागरमधील 100 वर्ष व्यापार करणाऱ्या मर्दा कुटुंबाने आपले दुसरे दुकान शृंगारतळीत सुरु केले आहे. मर्दा ॲण्ड सन्स या नावाने सुरु झालेल्या दुकानात आपल्याला स्टीलची भांडी, डबे, सर्व प्रकारचे प्लास्टीकवेअर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, स्टेशनरी, हाऊस क्लिनिंग उत्पादने, क्रॉकरी, आदी प्रकारात भरपुर व्हरायटी पहाता येणार आहे. याशिवाय भाजीचे दुकान, चहा, नाश्ता आदी सेवा देणारी दुकानेही गुहागरमध्ये सुरु झाली आहे.
तालुक्यातील मोडकाआगर हेदवी रस्त्यावर अडूर येथे नवलाई ऑटोमोबाईल्स या नावाने पेट्रोलपंप सुरु झाला आहे. या पेट्रोलपंपामुळे पालशेत, अडूर, हेदवी, नरवण ते तवसाळ परिसरातील ग्रामस्थांची मोठी सोय झाली आहे. हा रस्ता सागरी महामार्ग आहे. हेदवी, वेळणेश्र्वर पर्यटन स्थळे याच मार्गावर आहेत. तसेच तवसाळ जयगड फेरीबोट कडे जाणारा लघुत्तम आणि उत्तम मार्ग देखील हाच आहे. गुहागर तालुक्यात येणाऱ्या बहुतांशी पर्यटकांची वर्दळही याच रस्त्यावरुन असते. या सगळ्याचा मुद्द्यांचा विचार केला तर हा पेट्रोलपंप गुहागरच्या विकासात भर टाकणारा आहे.