गुहागर : परतीच्या पावसामुळे तालुक्यातील शेतीची पूर्णतः वाताहत झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पंचायत समिती उपसभापती सुनिल पवार यांनी नुकतीच पाहणी करून या शेतकऱ्यांना धीर दिला. तसेच शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.
परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागात कापणीला आलेल्या भातशेतीला बसला आहे. या पावसामुळे उभी भातशेती आडवी झाली असून कापलेली भातशेतीही पावसाच्या पाण्यात वाया गेली आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक पडला होता. कोरोनाच्या संकटामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनचा फायदा येथील भात लागवडीला झाला होता. अनेक चाकरमानी या काळात आपल्या मूळगावी असल्याने त्यांनी शेतीच्या कामात हातभार लावला होता. यामुळे यावर्षी सर्वाधिक भातशेती क्षेत्र लागवडीखाली आले होते. मात्र, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने मोठा धक्का बसला आहे. उपसभापती श्री. पवार यांनी मळण गावातील कृष्णा आग्रे, सुनील साळवी, अनंत आग्रे, संतोष आग्रे, पांडुरंग आग्रे, गंगाराम धनवडे, सीताराम सोलकर, चंद्रभागा सोलकर, महेंद्र सोलकर, वसंत सोलकर, नामदेव सोलकर, शशिकांत सोलकर, दत्ताराम सोलकर, सखाराम सोलकर आदींच्या शेतावर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली व शेतकऱ्यांना धीर दिला. नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून शासनाची मदत मिळवून देण्याचे आश्वासन देखील श्री. पवार यांनी शेतकऱ्यांना दिले.