तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सक्रिय; विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष दीपक जाधव यांचा पुढाकार.
गुहागर : गुहागर विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष दीपक जाधव यांनी नियुक्तीनंतर भातगाववासीयांचा एस.टी.चा प्रश्र्न मार्गी लावला. भातगावसाठी दोन एस.टी. बस फेऱ्या सुरु करण्याची मागणी दिपक जाधव यांनी केली. आगार व्यवस्थापक वैभव कांबळी यांनी येत्या सोमवारपासून या फेऱ्या सुरु करण्यात येतील अशी माहिती दिली.
तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदासह जिल्हा सरचिटणीस व विधानसभा मतदार संघाच्या उपाध्यक्ष पदाची निवड नुकतीच करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. सोमवारी गुहागर तहसील कार्यालय, पोलीस स्थानक व गुहागर आगार व्यवस्थापकांना नागरिकांच्या विविध समस्यांबाबत निवेदन व अडचणी सोडविण्यास संदर्भात चर्चा करण्यात आली.
आमदार भास्कर जाधव यांनी एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुहागर तालुक्यात राष्ट्रवादीचा झेंडा रोवला होता. काही महिन्यातच राष्ट्रवादी तालुक्यातील घराघरात पोहोचली होती. विकास कामांबरोबरच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते पुढे होते. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार जाधव यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. अशावेळी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी जि.प. सदस्य रामचंद्र हुमणे यांच्याकडे तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनीही पक्षाच्या पडत्या काळात विधानसभा निवडणूक होईपर्यंत तालुकाध्यक्ष पद सांभाळले. त्यानंतर काही महिने गुहागर तालुका राष्ट्रवादी दिशाहीन असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. तालुकाध्यक्ष नसल्याने काही ठराविक कार्यकर्ते आपापल्यापरीने पक्षाचे काम करताना दिसत होते. दरम्यान, खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या गुहागर दौऱ्यात तालुकाध्यक्ष पदासह अन्य दोन महत्त्वाच्या पदांची नियुक्ती केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवारी तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी गुहागर तहसीलदार कार्यालय, पोलिस स्थानक व गुहागर आगार व्यवस्थापक यांची भेट घेऊन जनतेच्या समस्या बाबत निवेदन दिले. आपल्या खात्याकडून नागरिकांना चांगली सेवा मिळावी अशी विनंती करण्यात आली. यावेळी विधानसभा मतदार संघाचे उपाध्यक्ष दीपक जाधव यांनी भातगाव मध्ये सध्या एकच वस्ती बस आहे. त्यामुळे तालुकास्थानी, मध्यवर्ती बाजारपेठेत येणाऱ्या लोकांची गैरसोय होत आहे. हे आगार व्यवस्थापक वैभव कांबळी यांच्या लक्षात आणून दिले. त्यावर आगार व्यवस्थापक वैभव कांबळे यांनी सोमवारपासून नव्या दोन बस सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे दुपारी २ वा. गुहागर -भातगाव, सायंकाळी ६ वाजता भातगाव – चिपळूण, सकाळी ५ वाजता चिपळूण- भातगाव, सकाळी ९ वाजता भातगाव -गुहागर अशा बसफेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे भातगाव व पंचक्रोशीतील नागरिकांना त्यांच्या ठिकाणी ये-जा करणे सोपे होणार आहे.
यावेळी जिल्हा सरचिटणीस विजय मोहिते, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मंदार कचरेकर, नगरसेविका सुजाता बागकर, तुषार सुर्वे, दीपक शिरधनकर, श्रीधर बागकर, साई लिंगायत आदी उपस्थित होते.