चुकीचे वागणाऱ्यांना ताडफाड बोलणारी, वाहनचालकांना मार्गदर्शन करणारी , नोकरी असली तरी स्वत:चा व्यवसाय असल्यागत काम करणारी एक तरुणी दाभोळ फेरीबोटीवर काम करते. गेली 16 वर्ष उनपाऊस, थंडीवाऱ्यात ही दुर्गा त्याच उर्जेने, तडफेने मोकलांच्या फेरीबोटीवर काम करत आहे. वेगवेगळ्या पध्दतीच्या माणसांना योग्य तऱ्हेने सूचना करण्याचे काम ती इतक्या सहजपणे करत असते की, दाभोळ धोपावे फेरीबोटीच्या प्रवास नव्याने येणारा पर्यटक, प्रवासी तिच्याकडे कुतहलाने बघतो. समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच सुरवातीला बुकींग विंडोवर काम करणारी ज्योती फेरीबोटीची कर्तबगार नायिका आहे.
सुवर्णदुर्ग फेरीबोट सेवा दाभोळ खाडीत सुरु झाल्यावर अनेकांना रोजगार उपलब्ध झाला. त्यापैकी दोनचार कर्मचारीच आजपर्यंत या सेवेत आहेत. त्यापैकी एक म्हणजे ज्योती महाकाळ. 16 वर्षांपूर्वी ज्योती येथे नोकरीला लागली तेव्हा मुलगी म्हणून तीला तिकीट खिडकीत काम देण्यात आले. पण व्यवसाय सुरु झाल्यावर फेरीबोटीतून फुकट प्रवास करणाऱ्या स्थानिकांची संख्या वाढू लागली. स्वाभाविकपणे फेरीबोटीवरील कर्मचारी आणि स्थानिक यांच्यात भांडणे व्हायची. हे नित्याचे झाले होते. या वादांची परिणीती हाणामारीत होणे सुवर्णदुर्ग कंपनीला परवडणारे नव्हते. म्हणून व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश मोकल यांनी बुकींग विंडोवर काम करणाऱ्या दाभोळच्या ज्योती महाकाळला तिकीट चेकर केले.
सुरवातीला पुरुषांच्यात काम करु लागल्यावर दाभोळ परिसरात ज्योतीची टिका होऊ लागली. फेरीबोटीवर अनेक प्रकारची माणसे येतात. त्यांच्यापासून जपून राहायचे असेल तर आपण कडक बनले पाहीजे हे तीने ओळखले. काहीजण नियम पाळत नसत, तीला पाहून टोमणा मारायचे. या सर्वांजवळ त्यांना समजेल अशा पातळीवर येऊन ज्योती बोलू लागली. त्यामुळे तीचा दरारा निर्माण झाला. तिच्याच शब्दांत सांगायचे तर ‘आपल्याला लोक घाबरतात. नादाला लागायची हिमंतच नाय कोणच्यात.’ गाडी लावण्या-उतरविण्यावरुन कर्मचारी आणि वाहनमालक यांच्यात वाद झाला तर ज्योती धिटाईने दोघांच्या मध्ये पडते. वाद थांबवते. अनुचित काही घडत नाही. ज्योती कौतुकाने सांगते, ’मी तिकीट चेकर झाल्यापासून बोटीतील एकाही सहकाऱ्यावर कोणी हात उगारला नाही. किंवा आमच्या सहकाऱ्याला कोणावर हात उगारायची वेळ आली नाही.’ बोटीवरील कर्मचाऱ्यांनीही ज्योतीबरोबर स्वच्छ नात जपलं आहे.
तिकीट चेकींग करण्याबरोबरच फेरीबोटीत गाड्या लावून घेण्याचे कौशल्याचे कामही ज्योती करते. पर्यटन हंगामात वाहनांची संख्या वाढली की, जास्तीत जास्त वाहन बसविण्याचा प्रयत्न ज्योती करते. तीच्या सुचना ऐकल्या तर हानी न होता गाडी बोटीत आणणे, बाहेर काढणे सहज शक्य होते. त्यामुळे अनेक पर्यटकांना ती उत्कृष्ट वाहनचालक असावी असे वाटते. सातत्याने कोकणात येणाऱ्या पर्यटकांबरोबर तीचे सौहार्दपूर्ण नाते निर्माण झाले आहे. याच नात्यातून हे पर्यटक ज्योतीला भेटवस्तु, खाऊ आणून देतात.
गेली 16 वर्ष ज्योती दाभोळ फेरीबोटीवर काम करत आहे. मोकल परिवारीतील एक सदस्य म्हणून तीला ओळखले जाते. ज्योतीताई बोटीवर असतील तर कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ होणार नाही याची खात्री व्यवस्थापनाला आहे. तसेच नियमीत प्रवास करणारे विद्यार्थी फेरीबोटीत सुरक्षित असतात याची खात्री विद्यार्थ्यांच्या पालकांनाही आहे. चुकीचे वर्तन करणाऱ्यांमध्ये तीचा दरारा आहे. महिला असूनही अशापध्दतीने विविध स्वभावाच्या पुरुषांच्या गर्दीत नोकरी करताना तीने निर्माण केलेले हे स्थान निश्चितच कौतुकास्पद आहे.