मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची लोकसभेत माहिती
नवी दिल्ली- मुसळधार पाऊस आणि भीषण पुराचा फटका बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकर्यांना मदत करण्यासाठी 700 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज मंगळवारी लोकसभेत दिली.
विरोधकांनी लोकसभेच्या कामकाजात सभभागी व्हावे, अशी विनंती सभापती ओम बिर्ला यांनी कित्येकदा केली. मात्र, विरोधकांचा गोंधळ कायम राहिल्याने प्रश्नोत्तरांचा तासातील कामकाज कित्येकदा थांबवावे लागले. लोकसभेतील पहिला तास हा लोकांच्या मुद्यांवर राखीव ठेवला जातो. पेगासस प्रकरणी चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी विरोधकांनी आज लोकसभेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला. या मुद्यावर गोंधळ घालताना त्यांनी नारेबाजी केली. आपल्या आसनांकडे परत जाऊन सभागृहाच्या कामकाजात सहभागी व्हा. सरकारकडून तुम्हाला सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळतील. कृपया सहकार्य करा, अशी विनंती त्यांनी वारंवार विरोधी पक्षाच्या सदस्यांना केली. या गोंधळातच केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी महाराष्ट्रात आलेल्या भीषण पुराबाबत सभागृहात निवेदन दिले. महाराष्ट्रात आलेल्या पुरात शेकडो जणांचा मृत्यू झाला असून, हजारो कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे.
महाराष्ट्रात आलेल्या भीषण पुरात झालेल्या नुकसानीचा विशेषतः शेतकर्यांना झालेल्या नुकसानीचा संपूर्ण विश्लेषणात्मक अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रातील शेतकर्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने 700 कोटी रुपये मंजूर केले आहेत, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या महत्त्वाकांक्षी पीक विमा योजनेअंतर्गत शेतकर्यांना नुकसान भरपाईचे दावे देण्यात आले आहेत. राज्य आपत्ती निवारण निधीअंतर्गत राज्यातील शेतकर्यांना अतिरिक्त नुकसान भरपाई दिली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्र सरकारच्या माहितीच्या आधारे अहवाल
महाराष्ट्र सरकारने नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर याबाबत केंद्र सरकारला माहिती दिली. त्यावर केंद्राने आतंर मंत्रालयीन समिती बनवली. या समितीने राज्यातील अधिकार्यांसोबत दौरा केला. तो दौरा केल्यानंतर अहवाल गृहमंत्र्यांना देण्यात आला. तो अहवाल मंजूर केल्यानंतर महाराष्ट्रासाठी 700 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली.
सभागृहाचे सत्र सुरू झाल्यावर 40 मिनिटांतच सभागृहाचे कामकाज काही वेळा स्थगित करावे लागले. या संधीचा फायदा घेत तोमर यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. आजच्या कामकाजात ग्रामीण भाग आणि शेतकर्यांशी निगडीत 15 पेक्षा जास्त प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे, हे सभापतींच्या माध्यमातून सदस्यांना विशेषतः विरोधकांना सांगतो आहे. शेतकर्यांचे भले व्हावे असे विरोधकांना थोड्या प्रमाणात वाटत असेल, तर त्यांनी आपल्या स्थानावर शांत बसावे आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे ऐकावीत, असे तोमर यांनी विरोधकांवर हल्ला चढवताना सांगितले.