तीन महिन्यांचे वेतन थकले, महागाईभत्ता व सण उचलीचे नावंच नाही
गुहागर : मुंबईसह राज्यात आपत्तकालीन परिस्थितही सेवा बजावणारे एस.टी. महामंडळाचे कामगारांना ऑगस्ट 2020 पासूनचे वेतन मिळालेले नाही. अन्य शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता एस.टी. कामगारांना मिळालेला नाही. सणाच्या वेळी कामगार आगावू उचल करतात. त्याबाबतचे धोरण दिवाळी तोंडावर येवूनही ठरलेले नाही. त्यामुळे 9 नोव्हेंबरपर्यंत एस.टी. महामंडळाच्या कर्मचार्ऱ्यांना देय रक्कम मिळाली नाही तर कामगार आक्रोश व्यक्त करतील. असे निवेदन राज्यातील एस.टी. कामगारांनी आज शासनाला दिले.
[bsa_pro_ad_space id=1]
कोरोनाच्या आपत्ती काळात सोई सुविधांचा अभाव असतानाही एस. टी. कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा बजावत होते. आजही कोरोनाचे समुळ उच्चाटन झालेले नसतानाही प्रवाशांची सेवा कामगार करत आहेत. सध्या मुंबई बेस्टची प्रवाशी वाहतूकही एस.टी. कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत करीत आहेत. या काळात एस.टी. महामंडळाचे बरेचसे कर्मचारी कोरोना बाधित झाले. सुमारे 74 कर्मचारी मृत झाले आहेत. अशा परिस्थितीत काम करत असतानाही एस.टी. कामगारांना ऑगस्ट 2020 पासूनचे वेतन दिलेले नाही. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एस.टी. कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता व सण उचल देण्याचे कामगार करारान्वये मान्य केलेले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना माहे डिसेंबर 2019 पासून वाढीव 5 टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे. परंतु एस.टी. कामगारांना सदरचा वाढीव 5 टक्के महागाई भत्ता लागू केलेला नाही. त्याचप्रमाणे 2018 ची वाढीव 2 टक्क्यांची 3 महिन्यांची थकबाकी व 2019 ची 3 टक्क्यांची 9 महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकीही एस.टी.कामगारांना अद्याप मिळालेली नाही. त्याचप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांना रु. 12 हजार 500 सण उचल लागू केलेली आहे. परंतु एस.टी. कामगारांना अद्यापपर्यंत सण उचल लागू केलेली नाही.
दिवाळीसारखा महत्त्वाचा सण 12 नोव्हेंबर 2020 पासून सुरु होत आहे. सदर सणापूर्वी एस.टी. कामगारांना २ महिन्यांचे थकीत वेत, ऑक्टोबर 2020 चे वेतन, महागाई भत्ता थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल मिळणे हा कायदेशीर हक्क आहे. महामंडळ आणि शासन आमच्या कायदेशीर हक्काकडे दुर्लक्ष करत असल्याने सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही आज आपल्यासह सर्व लोकप्रतिनिधींना हे निवेदन देत आहोत. मात्र सदर देय रक्कम 9 नोव्हेंबरपर्यंत न मिळाल्यास राज्यातील एस. टी. कामगार कुटुंबियांसह आपल्या रहात्या घरासमोर आक्रोश व्यक्त करतील. तरी आपणास विनंती आहे की, आपण आमच्या देय वेतन व थकीत महागाई भत्ता मिळण्यासाठी शासकीय पातळीवरुन प्रयत्न करावेत. म्हणजे एस.टी. कामगार व त्यांच्या कुटुंबियांची वेतनाविना होणारी उपासमार थांबण्यास मदत होईल. असे निवेदन गुहागर आगारातील महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या बहुसंख्य सभासदांनी डेपो सचिव अनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार कार्यालयात जाऊन निवेदन दिले.