पुणे : आळंदी पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये २३ जण करोनाबाधित असल्याचे अहवाल प्राप्त झाले. संबंधितांवर म्हाळुंगेतील करोना काळजी केंद्रात उपचार सुरू असले, तरी काही प्रमाणात घबराट उडाली आहे.
कोरोना सद्य:स्थिती आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्याबाबत सरकारने ठरवलेल्या नियमावलीत थोडी शिथिलता देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आळंदी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होणाऱ्या ३०६ जणांची ससून रुग्णालयात आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली, त्यापैकी २३ जणांचे अहवाल सकारात्मक आले. बाधित आलेल्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत.’
टाळ-मृदंगांचा गजर आणि हरिभक्तीत तल्लीन झालेल्या वैष्णवांच्या संगतीने शुक्रवारी संध्याकाळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या चलपादुकांनी श्रीक्षेत्र आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रस्थान सोहळ्यासाठी मोजक्याच वारकऱ्यांना प्रवेश देण्यात आला असला, तरी सोहळ्याच्या उत्साहात कोणतीही उणीव जाणवली नाही. ‘माउली माउली’ अशा जयघोषाने संजीवन समाधी मंदिराचा परिसर भक्तिरसात दुमदुमला.