गुहागर : गुहागर शहर परिसरात गेल्या आठवडाभरात सुमारे 15 वानर मेले. हे वाक्य चमत्कारीक आहे. परंतू सत्य आहे. याला कारण आहे खालचापाट जांगळवाडीतील महावितरणचे उपकेंद्र. दिवाळीपूर्वी जांगळवाडीतील उपकेंद्रातून वीज पुरवठा सुरु झाल्यानंतर वीजेचा धक्का लागून वानर मरण्याची संख्या वाढली आहे.
गुहागर वरवेली आणि असगोली या तीन गावांसाठी स्वतंत्र उपकेंद्राच्या उभारणीचे काम गेली 10 वर्ष सुरु होते. वास्तविक उपकेंद्राचे काम पूर्ण झाले. परंतु तेथे येणाऱ्या वीजवाहिन्यांच्या कामात अनेक अडथळे आले. अखेर या दिवाळीपूर्वी म्हणजेच 13 नोव्हेंबर 2020 पूर्वी नवे उपकेंद्र प्रवाहित करण्यात आले. हीच बाब वानरांसाठी जीवघेणी ठरली आहे.
गुहागर खालचापाट जांगळवाडीतील महावितरणचे नवे उपकेंद्र आजतरी जंगलाजवळ आहे. शृंगारतळीपासून या उपकेंद्रपर्यंत आलेली 33 के. व्हि.ची वीजवाहिनी देखील जंगलातूनच टाकण्यात आली आहे. उपकेंद्राचे काम रखडल्याने या वीजवाहिन्या वानरांसाठी खेळण्याचे ठिकाण बनले होते. या वीजवाहिन्यांमधुन सुरु झालेला वीजप्रवाह वानरांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे 33 के.व्ही. वीजवाहिन्या आणि उपकेंद्रातील वाहिन्यांवर वानर बसण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. हे वानर एकाचवेळी दोन वाहिन्यांना स्पर्श करतात त्यावेळी वीजेचा तीव्र धक्का बसून त्यांचा मृत्यु होतो. इतकेच नव्हेतर या वीजवाहिन्या 33 के.व्ही. दाबाच्या असल्याने वानराचा स्पर्श झाल्यावर क्षणात सुरक्षा प्रणाली कार्यरत होवून वीजप्रवाह खंडीत होतो. त्यामुळेच दिवाळीपासून गुहागरमध्ये वीज जाण्याचे आणि वानर मरण्याचे प्रमाण वाढले आहे.
महावितरणचे कर्मचारी देखील वानरांच्या मृत्युने हैराण झाले आहेत.
या उपकेंद्रातील कार्यालयात असणारे कर्मचारी अनेकवेळा वानरांना उपकेंद्रात येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतात. मात्र तात्पुरते पळुन गेले वानर कर्मचाऱ्यांचा डोळा चुकवून उपकेंद्रातील वीजवाहिन्यांवर उड्या मारतात. या खेळात अपघात घडला, एका वानराचा जीव गेला की पुढे चार, पाच तास वानर येत नाहीत. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती घडते. अशा घटना फक्त उपकेंद्रात घडत नाहीत तर 33 केव्हीच्या वीजवाहिनीवर जंगलात देखील घडतात. वीज खंडीत झाली की एकदा वीजप्रवाह सुरु केला जातो. पण पुन्हा वीजप्रवाह खंडीत झाला तर जंगलातील वीजवाहिन्यांची तपासणी करुन मृत्युमुखी पडलेला वानर तारांमध्ये अडकला तर नाही ना याचाही शोध घ्यावा लागतो. जोपर्यंत वानरांना धोका कळणार नाही तोपर्यंत आपण काहीच करु शकत नाही. अशी माहिती महावितरणच्या कनिष्ठ अभियंता प्रियांका वाठोरे यांनी दिली.