गुहागर : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष व अडचणीच्या काळात पक्षाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे तालुक्यातील रोहिले गावातील विजय मोहिते यांची नुकतीच राष्ट्रवादी जिल्हा कार्यकारणी सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. विजय मोहिते यांच्या रूपाने ग्रामीण भागात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला आहे.
विजय मोहिते यांनी २००३ पासून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराने प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर, रामचंद्र हुमणे, कै.नंदकिशोर पवार, कै. सहदेव गडदे, कै.दिलीप गडदे, माजी सभापती संपदा गडदे, आमदार भास्कर जाधव, सहादेव बेटकर व संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांच्या मार्गदर्शनानुसार पक्ष संघटनेचे काम आजतागायत करत आले आहेत. ग्रामपंचायत, पं. स., जि. प. निवडणूक,विविध कार्यकारी सोसायटी निवडणूक, विधानसभा आणि लोकसभा निवडणूक या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाला बळ देण्याचे काम केले आहे. माजी सभापती संपदा गडदे यांच्या दोन्ही पं. स. निवडणुकीत त्यांना निवडून आणण्यासाठी मोहिते यांचे योगदान तालुक्यातील सर्वांनाच माहीत आहे.
एकीकडे तवसाळ-पडवे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सदस्य, विशेष कार्यकारी अधिकारी, गुहागर तालुका शिक्षण समन्वय समिती सदस्य, काताळे तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती तवसाळ तांबडवाडीचे सदस्य, रत्नागिरी वेठबिगार दक्षता समितीचे माजी सदस्य, तवसाळ-पडवे विविध कार्यकारी सेवा सह.संस्थेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तवसाळ पं. स.गण अध्यक्ष अशा विविध संस्थांच्या पदाची धुरा सांभाळताना राजकारणातही आपल्या कामाचा धडाका ठेवला. खा. सुनील तटकरे यांनी नुकतीच विजय मोहिते यांची जिल्हा कार्यकारिणीवर सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे. पक्षाला अधिक बळकटी देण्यासाठी सदैव कार्यतत्पर राहणार असल्याचे श्री. मोहिते यांनी सांगितले.