गुहागर : तालुक्यातील वरवेली येथील प्रगतशील शेतकरी शेखर विचारे यांना शासनाचा उद्यान पंडित 2018 चा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल श्री. विचारे यांचे सर्वस्थरातून अभिनंदन होत आहे.
श्री. विचारे यांनी गुहागर तालुक्यातील वरवेली गावामध्ये पाच एकर क्षेत्रावर सेंद्रिय शेती यांनी केली आहे. यामध्ये दीड एकर क्षेत्रावर पांढरा कांदा लागवड केली आहे. यातून त्यांनी तीन ते साडेतीन टन उत्पन्न घेतले आहे. दीड एकर क्षेत्रावर सुरण लागवड केली आहे. तर पाव एकर क्षेत्रावर स्वीट कॉर्न (मक्का) याचे उत्पादन घेतले आहे. मक्याचे साडेतीनशे किलो दाणे साठवण करून त्याची ते विक्री करणार आहेत. याचबरोबर अहिल्याबाई होळकर या योजनेअंतर्गत कृषी विभागाकडून शेडनेट घेऊन झेंडू, पालेभाजी आदी शेतीसंबंधित उत्पादनाची रोपे तयार करून ती शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहेत.
श्री. विचारे यांनी आपल्या येथे उत्पादन घेतलेले पांढरा कांदा व सुरण हे बियाणे म्हणून वापर करून ते शेतकऱ्यांना पुरवणार आहेत. संपूर्ण शेती सेंद्रिय खतावर आधारित आहे. तालुका कृषि विभागाच्या वतीने उद्यान पंडित या पुरस्कारासाठी त्यांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्याप्रमाणे प्रगतशील शेतकरी श्री. विचारे यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.