प्रजासत्ताक दिनी गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे 21 व्या स्पर्धेचे आयोजन
गुहागर, ता. 27 : प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या क्रिक्रेट स्पर्धेचे विजेतेपद ग्रामिण रुग्णालय, गुहागरच्या संघाने पटकावले. तर उपविजेतेपद पोलीस ठाणे गुहागर संघाला मिळाले. या स्पर्धेतील मालिका वीर डॉ. काळे ठरले. गुहागर तालुका पत्रकार संघाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे हे 21 वे वर्ष आहे.
गेली 20 वर्ष गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धा शासकीय, निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी मर्यादित असतात. यावर्षीच्या स्पर्धेमध्ये पोलीस ठाणे, गुहागर, पंचायत समिती, गुहागर नगरपंचायत, भूमिअमिलेख, महसुल, महावितरण या कार्यालयांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी केले. यावेळी नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कविता बोरकर, आरोग्य सभापती अमोल गोयथळे, भाजपचे गटनेते उमेश भोसले, नगरसेवक समिर घाणेकर, गजानन वेल्हाळ आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर नगराध्यक्ष व नगरसेवकांनी क्रिक्रेट खेळण्याचा आनंद लुटला. स्पर्धेदरम्यान गटविकास अधिकारी अमोल भोसले, पोलीस निरिक्षक अरविंद बोडके, उपनिरिक्षक दिपक कदम, उपनिरिक्षक बी.के.जाधव, वैद्यकिय अधिकारी डॉ. बळवंत आदींनी आयोजक, खेळाडूंची भेट घेतली.
पहिला सामना नगरपंचायत गुहागर आणि ग्रामिण रुग्णालय यांच्यामध्ये झाला. सामन्याची नाणफेक गुहागर नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कविता बोरकर यांनी केली. दुसरा सामना पंचायत समिती गुहागर आणि महसुल व भूमिअभिलेख यांच्या संघात झाला. या सामन्याची नाणफेक सावर्जनिक बांधकाम उपविभाग गुहागरच्या उपअभियंता सलोनी निकम यांनी केली. चार षटकांच्या स्पर्धेत साळसकर, डॉ. काळे, प्रशांत रहाटे, टोंपे, समाधान रहाटे या खेळांडूंनी चमकदार कामगिरी केली. साखळी सामन्यात पोलीसांच्या संघाने स्पर्धेतील सर्वाधिक 43 ही धावसंख्या रचली.
अंतिम सामना ग्रामिण रुग्णालय विरुध्द पोलीस ठाणे गुहागर असा झाला. या सामन्यात डॉ. काळे यांच्या गोलंदाजीसमोर पोलिसांचा डाव गडगडला. चार षटकांमध्ये 28 धावांचे लक्ष्य ग्रामिण रुग्णालय गुहागरने सहज पार केले. विजेत्या ग्रामिण रुग्णालय संघाला पोलीस निरीक्षक अरविंद बोडके व उपविजेत्या पोलीस ठाणे संघाला संतोष वरंडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सामनावीर डॉ. काळे यांचा गौरव पत्रकार संघाचे अध्यक्ष मयुरेश पाटणकर यांनी केला. यावेळी स्पर्धाप्रमुख संकेत गोयथळे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मंदार गोयथळे, सचिव निलेश गोयथळे, माजी अध्यक्ष सत्यवान घाडे, मनोज बावधनकर, गणेश धनावडे, सदस्य सचिन ओक, उमेश शिंदे, महाराष्ट्र पत्रकार परिषदेचे बाबासाहेब राशिनकर, उपनिरीक्षक दिपक कदम आदी मान्यवर उपस्थित होते.