नरवण सारख्या खेडेगावात वैद्यकीय सेवेबरोबरच नारळ व आंबा बागायतीमध्ये रमलेले डॉ. अनिल जोशी आज विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक काम करत आहेत. नरवण पंचक्रोशीची गरज म्हणून छोटे परंतु सुसज्ज रुग्णालय त्यांनी उभे केले. कातळावर पावसाचे पाणी अडवून आंब्याची बाग उभी करणार्या डॉक्टरांची प्रयोगशील शेतकरी म्हणूनही ओळख आहे. नारळ विकासाचा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यासाठी डॉ. अनिल जोशींनी घेतलेली मेहनत सर्वश्रुत आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, रेड क्रॉस सोसायटी, रोटरी क्लब, गुहागर तालुका मेडीकल असोसिएशन अशा अनेक संस्थांमधून आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटविला आहे. डॉ. अनिल जोशी आज रत्नागिरी जिल्हाची मध्यवर्ती बँक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत.
मयूरेश पाटणकर, गुहागर | 21.08.2020
नरवण गावचे सुपुत्र असलेल्या अनिल जोशींचे प्राथमिक शिक्षण नरवण आणि पालशेत येथे झाले. माध्यमिक शिक्षण दापोलीत घेतल्यावर पुणे येथून वैद्यकीय क्षेत्रातील डी.एस.एस.सी. ही पदवी त्यांनी घेतली. 1974 मध्ये डॉ. अनिल जोशी पुन्हा नरवण येथे आले. त्याकाळात केवळ 8 महिने नरवणमध्ये वाहन येत असे. अशा अत्यंत दुर्गम गावात त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. डॉक्टरांच्या घराण्यात वैद्यकीय परंपरा आजोबांपासून सुरू झाली. कै. दत्तात्रयशास्त्री जोशी संस्कृत जाणकार होते. वाग्भट, सुश्रुत व चरक संहिता मुखोद्गत असलेल्या दत्तात्रयशास्त्रींनी म्हसळा, जि. रायगड येथील प्रसिद्ध वैद्य बिवलकर यांच्याकडून आयुर्वेदाचे ज्ञान घेऊन नरवणला वैद्यकीय सेवा सुरू केली होती. वडील विठ्ठलरावांनी बुलढाणा येथून ॲलोपॅथीचे शिक्षण घेतले होते. त्यामुळे वैद्यकीय व्यवसायात स्थिर होण्यासाठी डॉ. अनिल जोशी यांना सायास पडले नाहीत.
1993 साली गावातच जागा विकत घेऊन डॉ. जोशींनी छोटेसे परंतु त्या काळातील अत्याधुनिक असे रुग्णालय उभे केले. या रुग्णालयात एक्स-रे, पॅथॉलॉजिकल प्रयोगशाळा, ऑपरेशन थिएटर या सुविधा होत्या. त्यामुळे नरवण, चिंद्रावळे, वाघांबे, रोहीले, तवसाळ अशा विविध गावातील लोकांना आधुनिक उपचारासाठी नरवण सोडून जाण्याची गरज भासली नाही. यामुळे वेळ आणि पैसा वाचू लागला. रुग्णालयात दर आठवड्याला सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्जन व महिन्यातील एक आठवडा नेत्रचिकित्सक येत असे. 37 वर्ष आरोग्य सेवेचे व्रत डॉक्टर अनिल जोशी यांनी जपले. 2012 साली मुलगा शंतनू वैद्यकीय शिक्षण घेऊन आल्यावर रुग्णालयाचा सर्व कारभार त्याच्या हाती सोपवून डॉ. अनिल जोशीनी आपल्या सेवाव्रताला विराम दिला.
काळपरत्वे गुहागर तालुक्यातील चित्र बदलू लागले. रस्ते झाले, वाहतूक वाढली, ग्रामीण भाग दूरध्वनीने जोडला गेला. परिणामी ग्रामीण भागातील गावागावात स्वतंत्र दवाखाने उघडले. त्यामुळे वैद्यकीय व्यवसायाला संघटित स्वरूप देण्याची आवश्यकता आहे या विचारातून डॉ. अनिल जोशींनी गुहागर तालुक्यातील काही प्रतिष्ठित डॉक्टरांना सोबत घेऊन 2003 साली गुहागर तालुका मेडिकल असोसिएशनची स्थापना केली. केवळ संस्था स्थापन करून डॉक्टर थांबले नाहीत. दर महिन्याच्या 15 तारखेला तालुक्यातील सर्व डॉक्टरना एकत्र करु लागले. या दिवशी वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींकडून नवीन शोध, रोग त्यांची उपचारपद्धती या विषयीचे मार्गदर्शन तालुक्यातील डॉक्टरना मिळते व्यवसायात येणार्या अडचणी, सामाजिक बांधिलकीचे उपक्रम याविषयी या बैठकीत चर्चा केली जाते. डॉक्टर अनिल जोशींनी या संस्थेचे पद आपल्याकडे न ठेवता दरवर्षी मेडिकल असोसिएशनच्या कार्यकारिणीमध्ये तालुक्यातील डॉक्टरना संधी दिली. आजही हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमामुळे गुहागरच्या वैद्यकीय क्षेत्रात कधी स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले नाही. हे या संस्थेचे मोठे यश आहे.
मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून तालुकास्तरावर काम करताना 2004 साली डॉक्टर रोटरी क्लबशी जोडले गेले. 2007 साली रोटरी क्लब ऑफ गुहागरचे अध्यक्ष झाल्यावर सामाजिक कामासाठी अनिल जोशींना एक चांगले व्यासपीठ मिळाले. हिमोग्लोबीन व रक्तगट तपासणी, दंत तपासणी, नेत्ररोग निदान व चिकित्सा शिबिर, मोतिबिंदूची मोफत शस्त्रक्रिया, सर्व रोग निदान शिबिर, अपंगाना मोफत जयपूर फूटचे वाटप असे आरोग्यविषयक उपक्रम घेतले. मेणबत्ती व अगरबत्ती प्रशिक्षण, नारळ बागायतदारांना मार्गदशन असे उद्योगशीलतेला प्रोत्साहन देणारे कार्यक्रमही रोटरीच्या माध्यमातून घेतले. लोकांच्या मनाची मशागत करण्यासाठी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची बौद्धिक जिज्ञासा वाढविण्यासाठी इतिहासतज्ञ निनाद बेडेकर, महेश तेंडुलकर यांची व्याख्याने, एड्सग्रस्त श्रीमती वैशाली शिंदे यांचे अनुभव कथन, मानवाधिकारांची सखोल माहिती देण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकारी व पुनरूध्दार आंतराष्ट्रीय ट्रस्टचे प्रशासकीय संचालक डि.के. गुप्ता यांच्या उपस्थितीत चर्चासत्र, वाढते अपघात आणि सुरक्षिताता या विषयावर रत्नागिरीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. बाळाजी कांबळे यांचे मार्गदशन असे कार्यक्रम आयोजित केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कथाकथन, निबंध, वक्तृत्व, चित्रकला, हस्ताक्षर, क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले. तालुक्यातील गुणिजनांचा सत्कार केले. डॉ. जोशींनी आपल्या अध्यक्षपदाच्या काळात रोटरी सर्वसामान्यांपर्यंत पोचविल्याने त्यांना रोटरी इंटरनॅशनल ‘पॉल हॅरीस फेरो’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला. शिवाय गुहागरच्या रोटरी क्लबला RI Presidential Citation, Governor’s Citation, Club Presidents Appreciation Award या पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
वैद्यकीय व्यवसाय सुरू असतानाच रत्नागिरीतील डॉ. सामंत दांपत्यांनी उभ्या केलेल्या रेड क्रॉस सोसायटीशी डॉक्टर जोडले गेले. आज या संस्थेचे चेअरमन म्हणून डॉक्टर काम पहात आहेत. या संस्थेच्या माध्यमातून जिल्हाभरात रक्तदान शिबिरे घेतली जातात. देणगीच्या माध्यमातून उभ्या केलेल्या 20 लाख रुपयांतून रत्नागिरी मध्ये ‘ब्लड कॉम्पोनंट सेपरेशन युनिट’ उभे करण्यात डॉक्टरांचा मोठा सहभाग आहे. या युनिट मधून गरीबांना अत्यल्प दराने व काही वेळा फुकट रक्त दिले जाते. माखजन पंचक्रोशीला पुराचा तडाखा बसला तेव्हा रेड क्रॉस सोसायटीने अनेक कुटुंबाना मदतीचा हात पुढे केला होता. गुहागरमध्ये तीन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन डॉक्टर अनिल जोशी यांच्या पुढाकाराने झाले होते.
वैद्यकीय व्यवसाय आणि सामाजिक कामात रममाण होणार्या डॉ. अनिल जोशींचा शेती हा देखील जिव्हाळ्याचा विषय. भातशेती, भाजीपाला लागवड, 4 हजार आंबा कलमे, 500 नारळ, 250 सुपारी, 200 जायफळ कलमे हे डॉ. अनिल जोशी आणि सौ. दीपाली जोशी यांचे कृषीवैभव आहे. शेती बागायतीमध्ये डॉक्टरांबरोबरच पत्नी सौ. दीपाली यांचा मोलाचा वाटा आहे. तवसाळ येथील 55 एकर कातळावर प्रदीर्घ मेहनतीने फुलविलेली बाग म्हणजे शाश्वत शेतीचे उदाहरण आहे. खडकाळ जमीनीवर झाडांना जगविण्यासाठी पाण्याची उपलब्धता करणे आवश्यक असते. डॉ. अनिल व सौ. दीपाली यांनी तवसाळच्या जागेत 40 फूट लांब, 30 फूट रुंद आणि 20 फूट खोल असे शेततळे खोदले आहे. पावसाच्या पाण्याबरोबर कातळावरुन वाहून जाणारे पाणी या तळ्यात साठवले जाते. सुमारे 1 कोटी लिटरचा साठा कातळावर चर खोदल्याने शक्य होतो. शेततळ्याच्या खालील बाजूला 60 फूट खोलीची विहीर बांधण्यात आली आहे. या विहिरीला शेततळ्यामुळे बारमाही पाणी असते. संपूर्ण बागेत ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. पाण्याबरोबर आवश्यक असलेली खते ठिबक सिंचनाच्या माध्यमातून संपूर्ण बागेला दिली जातात. दरवर्षी आंब्याची झाडे छाटून त्यांची उंची मर्यादित ठेवण्यात आली आहे. परिणामी फवारणी करणे, आंबे काढणे सहज शक्य होते. या बागेत हळद, तीळ यांचे आंतरपीकही घेतात. जलसंधारण, मृदसंधारण, ठिबक सिंचन या त्रिसूत्रीचा वापर करून फुलविलेल्या आंबा बागायतीमुळे 2014 ला डॉ. अनिल जोशी यांना पद्मश्री (स्व.) डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्चतंत्र पुरस्काराने तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


डॉक्टर स्वतः:ची बाग फुलवून थांबले नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यातील नारळाचे उत्पादन वाढले पाहिजे यासाठी ते राजाभाऊ लिमये यांच्याबरोबरीने काम करत आहेत. ओरिसा, केरळ कर्नाटक, तामीळनाडू या राज्यांचे नारळ उत्पादनात प्रचंड आहे. त्यांच्या बरोबरीत रत्नागिरी जिल्हा आला पाहिजे ही डॉक्टरांची तळमळ आहे. त्यासाठी नारळ विकास बोर्ड कोची यांच्या साह्याने विविध उपक्रम जिल्ह्यात राबविण्याचे काम डॉक्टर करत आहेत. त्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात नारळ उत्पादकांचे विकास गट तयार करून या गटांना दोन वर्ष अत्यल्प दरात नारळासाठी लागणारी औषधे व खते नारळ बोर्डाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळावर चढण्याचे प्रशिक्षण वर्ग घेतले. नारळ संशोधकांना बोलावून दोन वर्ष नारळ दिन साजरा केला. नारळ विकास मंडळाशी संलग्न असलेल्या श्रीफळ उत्पादक हितवर्धक संघाची प्रत्येक तालुक्यात कार्यकारिणी तयार केली आहे. 20 ते 25 नारळ उत्पादकांची एक सोसायटी आणि अशा 25 सोसायट्यांची 1 कंपनी स्थापन करून नारळ विकास बोर्डातर्फे प्रक्रिया उद्योग, कर्ज उपलब्धी, खत व औषधे पुरवठा अशा सुविधा पुरविण्याचे डॉ. अनिल जोशींचे स्वप्न आहे.
गावाच्या विविध समस्या सोडविण्याचे काम त्यांनी गावकर्यांना बरोबर घेऊन केले. पंचक्रोशीतील अनेक रस्त्याचा आणि गावागावातून वीज येण्यासाठी लागणारा पाठपुरावा त्यांनी केला. नरवणमधील स्वातंत्र सैनिक पंडीत दिनकर शास्त्री कानडे स्मृती ग्रंथालयाच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा आहे. आज नरवणसारख्या छोट्याश्या गावातील ग्रंथालयात 6 हजार पेक्षा जास्त पुस्तके उपलब्ध आहेत. गुहागर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत. डॉक्टर जोशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचे गुहागर तालुका अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी सदस्य आहेत. या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम ते राबवीत असतात.
10 गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या हेदवी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या जंजाळातून बाहेर काढण्यातही डॉक्टरांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळेच या सोसायटीचे अध्यक्षपद डॉक्टरांकडे चालून आले. आणि सहकारासारख्या वेगळ्या क्षेत्रातून डॉक्टर जोशी यांनी कामाला सुरवात केली आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे गुहागर तालुका संचालक म्हणून ते निवडून आले. रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. या दोन जिल्हास्तरावरील मोठ्या संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यात सहकार रुजावा यासाठी सध्या डॉ. अनिल जोशी प्रयत्नशील आहेत.