28.08.2020
गुहागर : लॉकडाऊनच्या काळात बोगस ई पास देण्यात येत असल्याची तक्रार मनसेचे नेते संदीप देशपांडे केली होती. मात्र मनसेच्याच एका पदाधिकाऱ्याला नाशिक पोलीसांनी थेट गुहागरात येवून अटक केली. राकेश सुर्वे असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. मनसेचे तालूका संपर्क सचिव असे पद त्याच्याकडे आहे. या अटकेमुळे गुहागर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कोरोना संकटात अत्यावश्यक प्रवासासाठी राज्यात ई-पास सेवा सुरुवात झाली. हे परवाने मिळविण्यासाठी एमएचपोलीस कोविड19 नावाचे संकेतस्थळ बनविण्यात आले. या संकेतस्थळावरुन ई पाससाठी ऑनलाईन अर्ज केल्यावर एक टोकन नंबर मिळतो. हा टोकन नंबर जिल्हा अधिक्षक कार्यालयातून मंजूर झाल्यानंतर आपल्याला या पासवर प्रवास करता येतो. अनेकवेळा हे टोकन नंबर पोलीसांकडून मंजूर होत नाहीत. त्यामुळे या मागे मोठी यंत्रणा आहे. व भ्रष्टाचार होतो. पैसे दिल्यावरच ई पास मिळतो. असे आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले होते. राज्य शासनाने याची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली होती.
मात्र मनसेचा गुहागर तालुका संपर्क सचिव असलेला राकेश सुर्वे हा बोगस ई-पास बनवत असल्याची खबर नाशिक पोलिसांना लागली. त्यानंतर नाशिक पोलिसांनी थेट गुहागर गाठले. तालुक्यातील पडवे गावात गणेशोत्सवासाठी आलेल्या राकेश सुर्वेला अटक करण्यात आली. नाशिक पोलिस अधिक तपासासाठी त्याला नाशिकला घेऊन गेले आहेत. गुहागर पोलिस ठाण्याने हे वृत्त खरे असल्याचे सांगितले आहे. राकेश सुर्वे हा डोंबिवलीत रहातो. तेथून त्यांने बोगस ई पास बनविले होते. त्यातील नाशिकच्या ई पास बोगस असल्याचे समोर आले. तेथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली गेली. त्यानंतर नाशिक पोलीसांनी तपास सुरु केला होता. आता राकेश सुर्वेने आणखी कीती बोगस पास बनविले याचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान मनसे नेते व खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी राकेश सुर्वे मनसे पक्षाचा पदाधिकारी नसल्याचे जाहीर केले आहे. तर मनसेचे गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर म्हणाले की महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्ष नेहमीच लोकोपयोगी कामे करत आला आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष नेहमीच अग्रेसर राहीला आहे. पक्षाची तालुका कार्यकारिणी देखील चांगले काम करत आहे. मात्र काही संधीसाधू, स्वार्थी लोकांनी पक्षात राहून, पक्षाला बदनाम करण्याचे कृत्य केले आहे. अशांना पक्षातून हाकलून लावले पाहिजे. आम्ही प्रदेश सरचिटणीस वैभव खेडेकर, मनसेचे जिल्हा संपर्क अध्यक्ष अनिल खानविलकर ह्यांच्या मतांशी सहमत आहोत. अशी प्रतिक्रिया यावेळी तालुका सह संपर्क अध्यक्ष नितीन कारकर आणि सांस्कृतिक विभाग अध्यक्ष राहुल जाधव आदी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.