खासदार सुनील तटकरे : पर्यटन मंत्र्यांना निवेदन, हेदवीचाही समावेश
गुहागर : दरवर्षी भारतासह जगभरातील 330 मिलियन पर्यटक तीर्थस्थळांना भेटत देतात. रायगड लोकसभा मतदारसंघातील कड्यावरचा गणपती (आंजर्ले, ता. दापोली), दशभुज लक्ष्मीगणेश (हेदवी, ता गुहागर) आणि याकुबाबा दर्गा (ता. दापोली) या तीर्थस्थळांचा विकास स्वदेश दर्शन योजनेमधून व्हावा. त्याचप्रमाणे गुहागर आणि वेळणेश्वर येथील समुद्रकिनाऱ्यांचाही विकास करावा. अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्याकडे केली आहे.
3 फेब्रुवारीला खासदार सुनील तटकरे यांनी प्रल्हादसिंह पटेल यांची भेट घेतली. त्यावेळी रायगड लोकसभा मतदारसंघातील समुद्रकिनारे, ऐतिहासिक वास्तू आणि तीर्थस्थळे यांच्या विकासाबाबत केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी खासदार तटकरे यांनी लोकसभा मतदारसंघातील काही स्थळांना प्राधान्य देऊन स्वदेश दर्शन योजनेतून विकसीत करण्याचे निवेदन खासदार तटकरे यांनी दिले. यामध्ये गुहागर तालुक्यातील गुहागर समुद्रकिनारा, वेळणेश्वर समुद्रकिनारा आणि हेदवीचे गणपती मंदिर यांचा सहभाग आहे.
खासदार तटकरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कोविड 19 च्या संकटानंतर पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकाराने स्वदेश योजने अंतर्गत 13 वैविध्यपूर्ण पर्यटन क्षेत्रांचा विकास करण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये तीर्थस्थळे, समुद्रकिनारे, ऐतिहासिक वास्तू आदी क्षेत्रांचा समावेश आहे. रायगड लोकसभा मतदार संघात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली काही स्थळे ही योजनेत समाविष्ट करावीत.
समुद्रकिनाऱ्यांमध्ये गुहागर तालुक्यातील गुहागर व वेळणेश्वर, दापोली तालुक्यातील कर्दे, रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर, दिवेआगर आणि मुरूड यांचा समावेश योजनेत करावा. महाडजवळ असलेल्या बौध्दकालीन कुडा गुहामधील शिल्पकला पहाण्यासाठी अनेक पर्यटक येतात. पहिल्या शतकात खोदलेल्या या गुहा भारतीय संस्कृतीचा वारसा जपतात. मंडणगड मधील मंडणगड किल्ला, रायगड जिल्ह्यातील तळागड, खांदेरी आणि सुधागड हे ऐतिहासिक महत्त्व असलेले किल्ले आहेत. सुधागड हा किल्ला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून निवडला होत. त्याचप्रमाणे दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती, याकुबाबा दर्गा व गुहागर तालुक्यातील हेदवीचा दशभुज लक्ष्मी गणेश ही तीर्थक्षेत्रेही प्रसिद्ध आहेत.
कोकणातील ही क्षेत्रे विकसीत केल्यास पर्यटनवाढीला फायदा होईल. त्यातून रोजगार निर्मिती होईल तसेच लोककला आणि परंपरांचे देखील संवर्धन होण्यास मदत होईल. त्यामुळे केंद्र सरकारने स्वदेश दर्शन योजनेमधून विकसीत करावयाच्या पर्यटन क्षेत्रांमध्ये या स्थानांचा समावेश करावा.