आवश्यक बाबींच्या पूर्ततेसाठी केंद्र सरकारने माहिती मागविली
05.09.2020
गुहागर : दाभोळ पॉवर कंपनीने तालुक्यातील अंजनवेल येथे उभारले अत्याधुनिक व सुसज्ज असे निरामय हॉस्पिटल गेली अनेक वर्ष बंद आहे. तालुक्यात कोणतीच वैद्यकीय सुविधा नसल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद अवस्थेत असलेले हे हॉस्पिटल सुरू व्हावे, यासाठी शिवतेज फाउंडेशनने लोक चळवळ सुरु केली. या लोक चळवळीची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. हे हॉस्पिटल सुरू व्हावे, यासाठी राज्याचे मुख्य सचिवांकडून आवश्यक बाबींच्या पूर्ततेसाठी केंद्र सरकारने माहिती मागविली आहे.
दाभोळ पॉवर कंपनीने आपल्या वीज प्रकल्प शेजारीच तालुक्यातील रुग्णांसाठी अद्ययावत सुविधांनी युक्त असलेले हॉस्पिटल उभारले होते. या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधांबरोबरच परदेशातून उपचार करण्यासाठी डॉक्टर येत असत. केवळ तालुका नव्हे तर लगतच्या जिल्ह्यातील लोक देखील या ठिकाणी उपचारासाठी येत होते. परंतु, दाभोळ पॉवर कंपनी दिवाळखोरीत गेल्यानंतर अनेकांना जीवदान देणारे आणि गुहागरसारख्या ग्रामीण भागात असलेले एकमेव हॉस्पिटल बंद झाले. मध्यंतरीच्या काळात हे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री भास्कर जाधव, खासदार सौ. सुप्रिया सुळे आदींनी अनेक प्रयत्न झाले. मात्र, रुग्णालय सुरू झाले नाही. कोकणातील आरोग्याची सुविधा पाहता सध्या कोरोना विषाणूच्या समस्येला तोंड देण्यासाठी जर या हॉस्पिटलची अद्ययावत इमारत शासनाने स्वतःच्या ताब्यात घेतल्यास त्याठिकाणी रुग्णांवर उपचार करणे सोपे जाईल. जेणेकरून रुग्णालयाचा तालुक्याला, कोकणातील जनतेला फायदा होईल, याबाबत शिवतेज फाउंडेशनच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले होते.
दरम्यान फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी या निवेदनानंतर एवढ्यावरच न थांबता त्यांनी सोशल मीडियावर निरामय हॉस्पिटल सुरू व्हावे यासाठी आपली सर्वांची साथ मिळावी असे आवाहन जनतेला केले होते. याची दखल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी घेतली होती. जिल्हाधिकारी यांनीसुद्धा गुहागर तहसील कार्यालयाला पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, सदरील हॉस्पिटल इमारतीची चावी न मिळाल्याने आतून अधिकाऱ्यांना पाहणी करता आली नव्हती.
दरम्यान, माजी आमदार डॉ. विनय नातू यांनीही पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांना केंद्रीय पेट्रोलियम व प्राकृततिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पुढील कार्यवाहीचे पत्र दिले आहे. त्यामुळे निरामय रुग्णालय सुरू होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. निरामय हॉस्पिटल पुन्हा सुरू व्हावे, यासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्यांचे शिवतेज फाऊंडेशनचे अध्यक्ष ऍड. संकेत साळवी यांनी अभिनंदन केले आहे.