सुधाकर मास्कर यांचे आवाहन, शृंगारतळीत बैठकीचे आयोजन
गुहागर : लोककला जपायच्या असतील तर त्या सादरीकरण करणारे कलाकार जगले पाहिजेत. त्यासाठी लोककलांना राजाश्रय मिळाला पाहिजे. हा विचार लोककलांच्या संमेलनातून कायम मांडला जातो. मात्र कोकणातील नमन या लोककलेचे कलावंत संघटीत नसल्याने या चळवळीपासून दूर आहेत. त्यामुळेच गुहागर तालुक्यातील नमन मंडळे, निर्माते, आयोजक, संयोजक आदींच्या एकत्रित सभेचे आयोजन शृंगारतळी येथे करण्यात आले आहे. या सभेला तालुक्यातील लोककलांशी संबंधित सर्वांनी यावे असे आवाहन गुहागर तालुका नमन मंडळाचे निमंत्रक सुधाकर मास्कर यांनी केले आहे.
गुहागर तालुक्यातील लोककला सादर करणाऱ्या सर्वांसाठी रविवार दिनांक १४/०२/२०२१ रोजी, सकाळी ठिक १०.०० वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा गुहागर बाजार भवन, पेट्रोल पंप समोर, शृंगारतळी येथे होणार आहे. या संदर्भात बोलताना सुधाकर मास्कर म्हणाले की, बहुरंगी नमन ही रत्नागिरी जिल्ह्याची ओळख आहे. ही लोककला प्राचीन काळापासून करमणूकीचं माध्यम बनून राहीली आहे. या लोककलेत सध्या काही नमन मंडळांनी मुंबई सारख्या शहरी भागात व्यावसायिकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रगतीचं लक्षण आहे. त्याचं स्वागत सुध्दा व्हायला हवं. त्याच बरोबर ज्या बहुरंगी नमनाचा पाया गाव मंडळे व वाडी मंडळांनी घातला त्यांच्या त्या कलेच्या प्रती असणाऱ्या निस्सीम प्रेमामुळे, निष्ठेमुळे व त्यागामुळे बहुरंगी नमन ही लोककला आजपर्यंत टीकून राहीली आहे. जिवंत राहीली आहे.
नमन, खेळे ही लोककला पेशवाई काळापासून सादर होत असावी. खेळ्याच्या काही गाण्यातून राघोबा दादाच्या नावाचा उल्लेख आढळतो. १७२८ साली रामजी नाईक काळे व शिवराम नाईक गोडबोले या दोन महान किर्तनकारांनी कर्नाटकातून जो प्रकार महाराष्ट्रात आणला त्याचे दोन भाग आहेत . एक दशावतार म्हणून दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हात प्रसिद्ध पावली व नमन- खेळे उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात होऊ लागले.
परंतू नमन या लोककलेचा मान आणि सन्मान ज्या पध्दतीने शासन दरबारी व्हायला हवा होता तो मात्र झालेला दिसत नाही. त्याला बहुतांशी आपणच जबाबदार असल्याचं विचाराअंती लक्षात येईल. सार्वजनिक जिवनात कोणतीही गोष्ट संघटीत होऊन संघर्ष केल्याशिवाय आजपर्यंत कुणालाच मिळाली नाही. त्या बाबीला आपण तरी अपवाद कसे काय ठरणार . बहुरंगी नमन या लोककलेला व त्यातील लोककलावंत यांना न्याय मिळवून देण्यासाठी व शासन दरबारी बहुरंगी नमन लोककलेचा झेंडा रोवण्यासाठी मागील काही दिवसांपासून आपण जे संघटीत होण्यासंबंधी विचारविनिमय करत होतो. त्याचाच भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व लोककलाकारांना सोबत घेऊन संघटनेची बांधणी करण्याचे ठरविण्यात आले आहे.
याच अनुषंगाने गुहागर तालुक्यातील नमन मंडळाचे गावप्रमुख, निर्माते, आयोजक, संयोजक, याची मुंबई येथे सभा झाली. सदर सभेमध्ये झालेल्या चर्चेनुसार तालुका पातळीवर सभा घेण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. त्यानुसार गुहागर तालुक्याची सभा रविवार दिनांक १४/०२/२०२१ रोजी, सकाळी ठिक १०.०० वाजता, गुहागर बाजार भवन, पेट्रोल पंप समोर, शृंगारतळी येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी या सभेला गुहागर तालुक्यातील नमन मंडळाचे गाव प्रमुख , कलावंत, मंडळांचे चालक, निर्माते ,गावकर ,अधिकारी मंडळी, नमन कलेचे हितचिंतक यांनी उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी ८८५००९९०९० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन गुहागर तालुका नमन मंडळ, मुंबई व ग्रामीणचे संघटक निमंत्रक सुधाकर मास्कर यांनी केले आहे.