आज अनेक मूर्तिकार पीओपीला पर्याय शोधत आहेत. त्यासाठी शाडुच्या मातीमध्ये कागदाचा लगदा मिसळणे, केवळ कागदाच्या लगद्यापासून मूर्ति बनविणे आदी प्रयोग सुरु आहेत. या प्रक्रियेला चिरेखाणीच्या मातीने आणखी एक पर्याय मूर्तिकार सुभाष पडवेकर (रा. चिखली साळवीवाडी, ता. गुहागर) यांनी उपलब्ध करुन दिला आहे.
मयूरेश पाटणकर, गुहागर | 21.08.2020
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ति सुबक, सुंदर आणि कमी वेळात तयार होतात. त्यामुळे गणेश मुर्तींसाठी पीओपीचा वापर होवू लागला. परंतु विसर्जनानंतर मूर्ति चटकन विरघळत नसल्याने आणि जलप्रदुषण वाढत असल्याने पीओपीच्या वापराबाबत प्रश्र्नचिन्ह निर्माण झाले. मात्र चिखली साळवीवाडीतील (ता. गुहागर) सुभाष पडवेकर यांनी चिरेखाणीची माती वापरुन गणेशमुर्ती तयार करण्यास सुरवात केली. या गणेशमुर्तीही आकर्षक असल्याने गणेशभक्तांनी त्यांच्या प्रयोगाचे कौतुक केले आहे. त्यामुळे पर्यावरणपुरक, स्वस्त आणि आकर्षक गणेशमुर्तींसाठी चिरेखाणीची माती हा पीओपीला पर्याय ठरला आहे.
मूर्तिकार सुभाष पडवेकर आणि त्यांचा मुलगा सुदेश पडवेकर यांनी 5 वर्षांपूर्वी चिरेखाणीच्या मातीतून गणेशमुर्ती बनविण्याच्या प्रयोगाला सुरवात केली. आता हा प्रयोग यशस्वी झाला आहे. यंत्राद्वारे खाणीतून चीरे काढताना बारीक माती (भुसा) तयार होतो. ही माती त्यांनी आणली. तीन वेळा चाळून त्यांतील दगडाचे बारीक कण बाजुला केले. या मातीत 25 टक्के प्लॉस्टर ऑफ पॅरीस टाकून रबराच्या साच्यात मूर्ति ओतली. मजबुतीसाठी काथ्याही वापरला. त्यामुळे पीओपीप्रमाणेच आकर्षक, वजनाला हलकी आणि मज़बूत मूर्ति तयार झाली. फरक इतकाच की चिरेखाणीची माती लाल असल्याने मुर्तीला फीका लाल रंग आला. चिरेखाणीची माती असल्याने या मुर्तींचा पृष्ठभाग थोडा खडबडीत असतो. हलका पॉलिशपेपर मारुन पृष्ठभागाचा खडबडीतपणा घालवावा लागतो. रंगकाम केल्यानंतर ही मूर्ति चिरेखाणीच्या मातीपासून बनवली आहे हे कळतच नाही.
याबाबत बोलताना सुभाष पडवेकर म्हणाले की, पीओपीपेक्षा थोडी जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे पीओपी मुर्तीपेक्षा या मुर्तीचा दर थोडा अधिक असतो. मात्र शाडुच्या मातीपेक्षा ही मूर्ति स्वस्त आहे. शाडुच्या मातीमध्ये मूर्ति लवकर सुखत नाही. चिरेखाणीची माती चटकन सुखते. चिरा पडत नाहीत. पीओपीची मूर्ति विरघळण्यास 1 महिन्याचा कालावधी लागतो. चिरेखाणीच्या मूर्ति 10 दिवसांत पाण्यात विरघळतात. कोकणात जांभ्या दगडातील चिरेखाणींची संख्या मुबलक आहे. आता चीरे काढण्यासाठी सर्व खाण मालक यंत्राचा वापर करतात. त्यामुळे चिरेखाणीच्या माती सहज उपलब्ध होवू शकते. कोकणातील मुर्तीकारांनी या मातीचा वापर सुरु केला तर प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर सुमारे 75 टक्क्यांनी कमी होईल. परिणामी पर्यावरणाची हानि टळेल. पडवेकरांनी चिरेखाणीच्या मातीपासून गणेशमुर्ती बनविण्याचा प्रयोग यशस्वी केल्याने पर्यावरणपूरक गणपतीच्या संकल्पनेमध्ये आपण एक पाऊल पुढे जाऊ शकतो.