29.08.2020
कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रात मार्च महिन्यापासून राज्यातील धार्मिक स्थळे बंद आहेत. देशात ॲनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कार्यालये, दुकाने, कारखाने आदी गोष्टी सुरु होवू लागल्या. परंतु अजुनही राज्यातील धार्मिक स्थळे बंद आहे. या विरोधात भाजपने आज (ता. 29) राज्यभरातील मंदिरांमध्ये घंटानाद आंदोलन केले. भाजपच्या आंदोलनामध्ये विविध धार्मिक संघटना आणि संस्थाही सहभागी झाल्या होत्या.
गुहागरमध्ये घंटानाद आंदोलन यशस्वी
गुहागर तालुक्यामध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, जिल्हा सरचिटणीस सुरेश दादा सावंत, श्रीकांत महाजन, तालुकाध्यक्ष नीलेश सूर्वे, तालुका सरचिटणीस सचिन ओक, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संजय मालप, शहराध्यक्ष प्रकाश राहटे, उपाध्यक्ष संदीप गोरीवले,नाना पालकर,लक्ष्मणशेठ शिगवण, विजय भुवड, संतोष जैतापकर महेश तोडणकर, मंगेश जोशी, मयुरेश भागवत, सर्व नगरसेवक, तालुका-जिल्हा पदाधिकारी यांच्या विषेश पुढाकाराने 22 ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये तालुकावासीयांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. या आंदोलनानंतर तरी झोपी गेलेल्या ठाकरे सरकारला जाग येऊन कोरोना संबंधित सर्व नियम पाळून मंदिरे उघडण्यासाठी सरकार तयार होईल अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.
भाजपच्या घंटानाद आंदोलनाची माहिती देताना तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे म्हणाले की, कोरोना महामारी संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च २०२० पासून राज्यातील सर्व मंदिरे बंद आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर देशभरातील जैन धर्मीयांची मंदिरे सुरू झाली आहेत. मग हिंदू धर्मियांची मंदिरे बंद का ? देशात दारू विक्री सुरू झाली आहे मंदिरे बंद का असा जाब विचारत कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेलेल्या या महाआघाडीच्या ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले आहे.
राज्यात नाशिकच्या रामकुंडावर हे घंटानाद आंदोलन करण्यात आले. तेथे डमरुनादही करण्यात आला. मुंबईत प्रभादेवीमधील सिध्दीविनायक मंदिराबाहेर भाजप नेते राम कदम यांच्या नेतृत्त्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले. पुण्यात दार उघड, उद्धवा दार उघड या टॅगलाईनखाली आंदोलन पार पडले. भाजप खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ता टिळक या आंदोलनात सहभागी झाले होते. पुण्यातील सुमारे 100 मंदिरामध्ये हे आंदोलन करण्यात आले. शिर्डी येथील साईबाबा मंदिरातही हे आंदोलन करण्यात आले.