(बातमी तपशीलात मिळण्यास उशिर झाल्याने आज प्रसिध्द करत आहोत.)
गुहागर, ता. 06 : शहरातील संजय सावरकर आणि उदय सावरकर यांची बहीण स्वाती सावकर (वृषाली तांबे) (वय 57) यांचे गुरुवारी (ता. 6) पुण्यात अपघाती निधन (Accidental death) झाले. त्यांचे सासर असगोलीत असल्याने त्यांच्या निधनाने गुहागरवासीयांना धक्का बसला आहे. त्याच्या पश्चात तीन मुली, दोन जावई, नातवंड असा परिवार आहे.
वृषाली तांबे (स्वाती सावरकर) गुरुवारी (ता. 6) सकाळी धायरी रायकर मळा येथील रहात्या घरातून दुचाकीने कर्वेनगरमधील पोस्ट कार्यालयात कामावरत जात होत्या. वडगाव पोस्ट ऑफिस, मुक्ताई गार्डन जवळ एका मुख्य रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या पाण्याच्या टँकरने दुचाकीवरुन जाणाऱ्या वृषाली तांबे यांना धडक दिली. त्यामध्ये वृषाली तांबे टँकरखाली चिरडल्या गेल्याने वृषाली तांबे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. Accidental death
महावीर महादेव मासाळ (वय 35) रा. राम मंदिराशेजारी, आंबेगाव बुद्रुक असे टँकरचालकाचे नांव आहे. पूणे पोलीसांनी महावीर मासाळ याला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरिक्षक किशोर तनपूरे करत आहेत. अशी माहिती पुण्यामधून मिळाली आहे.
स्वाती सावरकर तथा वृषाली तांबे गुहागर शहरात अनेक वर्ष पोस्टात नोकरीला होत्या. त्याचे पती कै. विश्र्वनाथबुवा तांबे किर्तनकार आणि गायक होते. सासर (असगोली), माहेर (गुहागर) जवळजवळ असल्याने अनेक वर्ष तांबे कुटुंब गुहागरात रहात होते. विश्र्वनाथबुवांचे कॅन्सरने निधन झाल्यानंतर मुलींच्या महाविद्यालयीन शिक्षण आणि करिअरसाठी स्वातीताईनी पुण्यातील पोस्ट ऑफिसमध्ये बदली करुन घेतली. त्यानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या होत्या.