24.08.2020
गुहागर – गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणात गुहागर तालुक्यातील देवघर-चिखली गावाच्या दरम्यान, लहान मोठ्या नाल्यांची कामे अद्यापही अपूर्णच असल्याचे दिसून येत आहेत. ठेकेदाराने काँक्रीटचा रस्ता चिखलीपर्यंत बऱ्यापैकी मार्गी लावला पण नाल्यांची कामे अर्धवटच ठेवल्याने चिखल होऊन रस्ता निसरडा झालेला आहे. त्यामुळे वाहनचालक व गावी आलेल्या चाकरमान्यांच्या वाटेवर पदोपदी लाल मातीचा गालिचाच जणू अंथरल्याचे भासत आहे. ठेकेदाराच्या या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला आहे.
रस्ता रुंदीकरणात मार्गताम्हाने ते चिखलीपर्यंत बऱ्यापैकी रस्ता रुंदीकरणाच्या काँक्रीटचे काम ठेकेदाराने केले. मात्र, काही ठिकाणी रस्त्याची एक बाजू अद्यापही काँक्रीटची करण्यात आलेली नाही. तसेच ठिकठिकाणी लहान-मोठे नाले, ओहळ रस्त्याच्या खालून असून त्यांची कामे ठेकेदाराने अर्धवट ठेवलेली दिसून येत आहे. नाले व ओहळ यांचे फाऊंडेशन व भिंती सीमेंट काँक्रीटच्या बांधण्यात आल्या मात्र, त्यावरील बांधकाम व रस्ता काँक्रीट न झाल्याने संपूर्ण लाल मातीचा चिखल या भागात झाला आहे. ये-जा करणारी लहान-मोठी वाहने या चिखलात फसत असून अनेक दुचाकीस्वारांची घसररगुंडी होत आहे. सध्या गणेशोउत्सवासाठी चाकरमानी गावाला आलेले आहेत. गुहागर तालुक्यात बऱ्यापैकी चाकरमानी यावेळीही आलेले आहेत. त्यांना अशा चिखलाचे व निसरड्या रस्त्याचे दर्शन होत आहे. सुमारे 5 ते 6 नाले व ओहळ देवघर ते चिखली या दरम्यान, असून त्यांची कामे अर्धवट राहिल्याने वाहनचालक, प्रवासी यांना ते डोकेदुखी ठरत आहेत.
दरम्यान, रस्ता रुंदीकरणात ठेकेदाराने भर पावसाळ्यात काम सुरु केले असले तरी अद्यापही एका बाजूचे रुंदीकरण काही प्रमाणात रखडले आहे. मध्यंतरी रुंदीकरण केलेल्या काँक्रीटच्या रस्त्यावर तडे गेलेले आढळले होते. मात्र, याचा गवगवा होताच ठेकेदाराने हे तडे सिमेंटने बुजविले. मात्र, बुजविलेल्या या खुणांचे आजही वाहनचालक व प्रवाशांना दर्शन होत आहे. त्यामुळे अनेकांनी रस्ता रुंदीकरणाच्या कामाबाबत शंका उपस्थित केली आहे.