राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम, अनेक संस्थांचा व्याप, भटक्या विमुक्त मागास ज्ञातीसंस्थाचे काम यामध्ये अविरत मग्न असणारे आमचे दादा खर्या अर्थाने कर्मवीर. त्यांनी उभारलेल्या कामांच्या वटवृक्षाच्या छायेत लहानाचे मोठे होताना खरतरं एक मोठं दडपण आमच्यावर होत, आजही आहे. दादांसारखे आम्ही होऊ शकत नाही. पण त्यांनी मळलेल्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न आम्ही भावंड करत आहोत. दादांची सहचारीणी म्हणून आईने किती दु:ख, यातना गोड मानून घेतल्या ते आम्ही जवळून पाहिले. पण तिने आमच्यावरील मायेची पाखर कधी कमी होऊ दिली नाही. दादांची उणीव भासू दिली नाही. आई आणि दादांच्या प्रवासातून संघ विचारांची ओळख वाचकांना व्हावी यासाठी हा अल्पसा प्रयत्न.
श्रीराम तथा भाऊ इदाते
टेटवली, ता. दापोली येथे दादांचा (भिकुजी इदाते) जन्म 2 जून 1949 मध्ये झाला. घरात अठराविश्व दारिद्रय. चार बहिणी आणि दादा यांचे संगोपन करणेही कठीण अशी स्थिती. त्यावेळी टेटवलीत संघ कार्यकर्ते गो. वि. भागवत शिक्षक होते. आजोबांच्या इच्छेविरुध्द जावून त्यांनी दादांना कोळथर्यातील कृष्णामामा महाजन यांच्या वसतीगृहात ठेवले. त्या वसतीगृहात कृष्णामामांचा मिळालेला सहवास आणि संघशाखेतून परोपकार, माणुसकी, समाजाकडे पाहण्याची दृष्टी दादांना मिळाली. संघाशी ते कायमचे जोडले गेले. सरोदे समाजातील दादा पहिले पदवीधर झाले. संघकाम करता यावे म्हणून बीएस्सी पूर्ण झाल्यावर बीएड करुन दादा दापोलीत शिक्षक म्हणून नोकरी करु लागले. शिक्षण सुरू असतानाच दादांचे लग्न झाले. स्वत:च्या संसाराबरोबरच चार बहिणींच्या लग्नाची जबाबदारीही दादांच्या खांद्यावर होती. प्रचारक जाता आले नाही याची टोचणी लागून राहील्याने दादा शाळेतून मिळणारी प्रत्येक सुट्टी संघप्रवासासाठी घेत असत. देशात आणिबाणी लागू झाल्यानंतर अनेक नातेवाईकांनी संघकाम सोडून देण्याचा आग्रह केला. तो न जुमानता संघकाम करण्याची परिणिती मिसाखाली अटक होण्यात झाली. पगार थांबला. घर संसार उघड्यावर आला. त्यावेळी आईने (सौ. वंदना) प्रसंगी रस्त्यावर दगड फोडण्याचे काम करुन संसार टिकवला. संघात शाखेचा गटनायक, जिल्हा कार्यवाह, 15 वर्ष महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह, क्षेत्रीय (महाराष्ट्र व गुजराथ) बौद्धीक प्रमुख, सामाजिक समरसता विषयाचे अखिल भारतीय संयोजन अशा विविध जबाबदार्यांवर दादांनी काम केले. चार बहिणींची लग्न झाल्यावर दादांनी संघकामासाठी नोकरीचा राजीनामा दिला. घरची परिस्थिती बेताची असल्याने राजीनाम्यावरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र संघकामाला वेळ मिळावा म्हणून दादा राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम राहीले. व्यवसाय सुरू केला तर संघ कामाला अधिक वेळ देता येईल हा त्यामागे विचार होता. तत्कालिन स्थानिक संघ कार्यकर्त्यांनी दापोलीतील राजकमल मेडिकल स्टोअर्समध्ये दादांना भागीदार करुन घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 15 वर्षांनी दादांनी डी.फार्मसीचे शिक्षण घेतले.
या प्रवासादरम्यानच समाजातील समस्यांवर उत्तर शोधत दादांनी काही संस्थाही सुरू केल्या. असोंडमध्ये मागास विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुरू करुन संस्थात्मक कामाचा श्रीगणेशा झाला. आज पैसे कमावण्यासाठी अनेक संस्था उभ्या रहातात. दादांनी अनेकवेळा पदरमोड करुन समाजहितासाठी संस्था उभ्या केल्या. आज अशा संस्थांच्या संख्यनेही अर्धशतक गाठले असेल.
सामाजिक समरसता मंच या संघविचारांच्या संस्थेचे काम दादांवर सोपविण्यात आले. तेव्हापासून दादांची धावपळ, प्रवास अधिकच वाढला. महाराष्ट्र राज्यातील दलित, मागास, भटक्या समाजाजवळ त्यांचा संपर्क कीती होता याचा प्रत्यय आम्हाला महाबळेश्वरला आला. कुटुंबासह फिरायला गेलो असता एक कुडमुडा ज्योतिषी फारच पाठीमागे लागला. म्हणून त्याला हात दाखवला चौकशी करताना आम्ही दापोलीचे म्हटल्यावर त्याने दादा इदातेंना ओळखता का असे विचारले आणि त्यांचा मुलगा आहे समजल्यावर चक्क पाय धरले. सोलापूरला दादांना अपघात झाल्यानंतर नंदीबैल, मांग, मातंगी, धनगर, फासेपारधी, मसणजोगी, गोपाळ, मरीआईवाले, जोशी, वासुदेव, आदी अनेक ज्ञातींच्या माणसांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली. एकदा दापोलीत आलेला एक वासुदेव आमचे घर शोधत आला. या मंडळींसाठी दादा देवमाणुस होते.
कामाचा हा पसारा सांभाळताना दादांचे कुटुंबाकडेही लक्ष असायचे. आम्हां भावंडांचे कौतुक त्यांना करता आले नाही. बाललीला पहाता आल्या नाहीत. नातवडांचे कोडकौतुक करुन ही हौस त्यांनी पूर्ण केली. आमचा अभ्यास, संघशाखा, यावर त्यांचे बारीक लक्ष असे. शिक्षण पूर्ण झाल्यावर काही संस्थांचे काम आमच्यावर त्यांनी सोपविले. हे काम योग्य पध्दतीने सुरू आहे ना याची त्रयस्थपणे आजही ते काळजी घेतात. विवेकदादा, सौ. वेदिका वहिनी, त्यांची मुले वेदांत, अर्थव व कस्तुरी; मी (श्रीराम), माझी पत्नी सौ. संपदा, मुले स्वस्तिक व आरुष, संपदाताई व तीची मुले एैश्वर्या व आशिष या सर्वांवर दादांचे जीवापाड प्रेम आहे. प्रवासात असताना सार्यांची चौकशी असतेच. घरी आल्यावर प्रत्येकाला भेटून विचारपूस करतात. घरात कोणी आजारी पडले तर ते आजही अस्वस्थ होतात.
दादा 1999 मध्ये महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या विमुक्त जाती व भटक्या जमाती अभ्यास व संशोधन समितीचे दादा अध्यक्ष होते. भटके व विमुक्तांसाठी स्वतंत्र मंत्रालयासह त्यांनी सुचविलेल्या अनेक शिफारसी महाराष्ट्र सरकारने स्विकारल्या. राज्य मागासवर्ग आयोगाचे दोन वेळा सदस्य व सहा महिने हंगामी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. 2010 मध्ये मुंबई विद्यापीठाचे सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून जानेवारी 2015 मध्ये त्यांची नियुक्ती झाली. तसेच मा. पंतप्रधान अध्यक्ष असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त नेमेलेल्या उच्चाधिकारी समितीचे दादा सदस्य होते.
अशा प्रतिष्ठेच्या पदांवर काम करताना स्वच्छ चारित्र्याची प्रतिमा, पारदर्शकता प्रसिध्दीपराङमुख दादांनी जोपासली. या पदांमुळे त्यांच्या राहणीमानात, जीवनमानात कोणताही बदल झाला नाही. अनेक सत्कार, पुरस्कार, मान सन्मान त्यांना मिळाले. पण या कर्मयोग्याने त्यात स्वत:ला गुंतवून न ठेवता आपला कर्मयज्ञ सुरू ठेवला आहे. वाढते वय, बालपणी झालेली आबाळ, अविश्रांत प्रवास यामुळे मधुमेह, रक्तदाब, गुडघेदुखी, हृदयविकार यासारखे आजार त्यांना चिकटले आहेत. पण त्यांनाही मित्र बनवून आजही ते कार्यमग्नता जीवन व्हावे मृत्यु ही विश्रांती या संघगीताप्रमाणे कार्यरत आहेत.
दादांना मिळालेले हे पुरस्कारचं त्यांच्या कार्याचे दर्शन घडवितात.
* 1991 - मधुकरराव देवल सामाजिक पुरस्कार (हस्ते - मा. अटलबिहारी वाजपेयी)
* 2005 - स्वामी विवेकानंद सेवा सन्मान पुरस्कार (बडा बाजार पुस्तकालय, कलकत्ता या संस्थेचा पुरस्कार, हस्ते राज्यपाल विष्णुकांत शास्त्री)
* 2005 - कर्मवीर ही उपाधी (जगद्गुरु नरेंद्राचार्य यांच्या नाणीज पीठाकडून)
* 2006 - उत्कृष्ठ ग्रंथ संग्राहक व पुरस्कार (कोकण मराठी साहित्य परिषद; हस्ते मधु मंगेश कर्णिक)
* 2010 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन पुरस्कार (औरंगाबाद महानगरपालिका)
* 2013 - श्री स्वामी समर्थ गौरव पुरस्कार (हस्ते जनमेजय राजे, अक्कलकोट )
* 2015 - गुणवंत नागरी पुरस्कार (दादा गांवकर प्रतिष्ठान, हस्ते केसरी पाटील)
* 2016 - राष्ट्रीय गौरव अवार्ड, नवी दिल्ली (हस्ते भीष्म नारायण सिंग)
* 2017 - भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम एक्सलन्स अवॉर्ड, नवी दिल्ली. (हस्ते लोकसभा अध्यक्ष श्रीमती मिरा कुमार)
* 2017 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर रत्न पुरस्कार (हस्ते अर्जित चव्हाण, झी 24 तास उपसंपादक)
* 2018 - ग्लोरी ऑफ इंडिया अवार्ड (इंडिया इंटरनॅशनल फ्रेन्डशीप सोसायटी या संस्थेचा पुरस्कार दादांना थायलंडचे उपपंतप्रधान एच. इ. कोर्न दब्बारान्सी यांच्या हस्ते बँकॉक येथे देण्यात आला.)
आई आहे म्हणून दादा कर्मवीर
दादा कायम संघकामात मग्न असल्याने आईच आमचे सर्वस्व होते. ममत्व आणि करारी वृत्तीने तिने आम्हांला वाढवले, संस्कारीत केले. एका कर्मवीराची पत्नी म्हणून घराचा आधार ती बनली. दादांची आई, 4 आत्या, आम्ही मुल असा संसाराचा गाडा हाकताना अनेकवेळा आर्थिक चणचण भासत असे. पण त्याविषयी तिने दादांजवळ कधीच तक्रार केली नाही. आणिबाणीच्या काळात 16 महिने दादा तुरुंगात होते. घरात खायला अन्न कुठून आणायचे हा प्रश्न होता. तेव्हा या माऊलीने रोजगार हमी योजनेत रस्त्यावर दगड फोडले. खडी पसरली. घरगुती स्वरुपातील साड्या विकण्याचा छोटासा व्यवसाय सुरु केला. 4 म्हैशी घेऊन दुध विक्री केली. दापोली एस.टी. स्टॅण्ड परिसरात संतोष एजन्सी या नावाने बुकस्टॉल उघडला. आजी, आत्या आणि आमच्यात मोठा असलेला विवेकदादा या व्यवसायत आईला मदत करत असत. दादांची आई देखील मोलमजुरी करत होती. अशाप्रकारे कणखर होऊन, कोणासमोर हात न पसरता आलेल्या संकटावर आईने कुटुंबाला सोबत घेऊन मात केली. दादांना या परिस्थितीची झळ कधीच पोचू दिली नाही. दादा घरी आल्यानंतर कालांतराने या गोष्टी मित्रमंडळींकडून त्यांना समजल्या. अतोनात कष्टामुळे तरुणपणीच पाठदुखी व कंबरदुखीची व्याधी आईला चिकटली ती कायमचीच. पण या वेदना तिने कधी चेहर्यावर दाखवल्या नाहीत. स्वच्छता, टापटीपपणा आणि योग्य वेळी योग्य गोष्ट झालीच पाहिजे हा तिचा आग्रह असायचा. हाताखाली काम करणार्यांना ऑर्डर सोडण्यापेक्षा स्वत:चे ते काम उरकुन टाकायचे.
दादांच्या कामाचा व्याप वाढला तसा घरी येणार्यांची संख्याही वाढली. काही मंडळी सल्ला मागण्यासाठी, काही समस्या सोडविण्यासाठी तर काही भेटण्यासाठी येत असतं. त्या सर्वांचे आदरातिथ्य आई प्रेमाने करत असे. या मंडळींना कधीही दादांचा फाटका संसार आईने दाखविला नाही. किंवा परिस्थिती सांगून सहानभुती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील या संघगीताप्रमाणे दादांच्या भरारीला बळ देताना संसाराचा पाया भक्कमपणे या माऊलीने समर्थपणे सांभाळला. आम्हाला शिकवलं, मोठं केल. आनंद उपभोगणं तर आई केव्हाच विसरुन गेली होती. नव्हे येणारे प्रत्येक संकट परतवून लावण्यातच आई आनंद मानत होती असं म्हटल तर वावगं ठरणार नाही.