कोरोना आपत्तीत उत्तम कामगिरी बजावलेल्या ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. यामध्ये गुहागर तालुक्यात पाटपन्हाळे प्रथम, आबलोली द्वितीय तर कोळवली ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्यांना अनुक्रमे 1 लाख, 50 हजार, 25 हजार व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते रत्नागिरीत स्वातंत्र्यदिनी गौरविण्यात आले.
मयूरेश पाटणकर, गुहागर | 22.08.2020


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने शर्थीने प्रयत्न केले. त्यासाठी सर्व महसुल प्रशासन, पोलीस, आरोग्य यंत्रणा यांच्या खांद्याला खांदा लावून सरपंच संजय पवार कोरोना योद्धा बनले. मार्च महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण शृंगारतळीत सापडला होता. परिणामी लॉकडाऊनपूर्वीच गुहागर तालुक्यातील सर्व व्यवहार ठप्प झाले. शृंगारतळी परिसर आयसोलेट केला गेला. अचानक उद्भवलेल्या आणिबाणिच्या परिस्थितही न डगमगता सरपंच संजय पवार यांनी ग्रामपंचायतीतर्फे कार्यक्षेत्रात फवारणी करणे, ग्रामस्थांना धान्य भाजीपाला पुरविणे, गावात तैनात असलेल्या पोलीसांच्या अडचणी सोडविणे, आरोग्य कर्मचाऱ्यांना होम टू होम तपासणीसाठी सहकार्य करणे आदी उपाययोजना तातडीने राबविल्या. शृंगारतळी मध्यवर्ती बाजारपेठ असल्याने अनियंत्रित गर्दीने कोरोना संक्रमणाचा तडाखा सातत्याने गावाला बसत होता. अशा वेळी ग्रामस्थ, व्यापारी, प्रशासन यांच्यात समन्वयाचे काम ग्रामपंचायतीने केले. जनजागृतीच्या अभियानाबरोबरच व्यापारी संघटनांशी संवाद आणि गावात कोरोनाग्रस्त झालेल्यांना योग्य उपचार करण्यासाठीची धावपळ 5 महिने सरपंच संजय पवार करत होते. जुनमध्ये संजय पवार यांच्या परिवारातच कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यामुळे सातत्याने फिरणाऱ्या सरपंचानाही कोरोनाची लागण होते की काय अशी भिती निर्माण झाली होती. मात्र लोकांसाठी धडपडणाऱ्या संजय पवारांपासून कोरोना दूर पळाला. सर्व सहकाऱ्यांना, ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांना सोबत घेवून कोरोनाबरोबरची लढाई संजय पवार लढले.
या मेहनतीची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले आहे. या पुरस्काराचे वितरण स्वातंत्र्यदिनी रत्नागिरीचे प्रांताधिकारी व रत्नागिरीचे तहसीलदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्विकारण्यासाठी सरपंच संजय पवार, शृंगारतळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजित बेलवलकर, ग्रामस्थ दिनेश चव्हाण, ग्रामविस्तार अधिकारी आर.जी. बेंडल, निखिल बेंडल आदी उपस्थित होते.