सुरळमधील घटना, वाडदईत दोन जनावरांनाही मारले
गुहागर, ता. 22 : तालुक्यातील सुरळ मोहल्ला येथे सार्वजनिक विहीरीमध्ये पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले आहे. या बिबट्याला वन खात्याने चिपळूण तालुक्यातील जंगलात सुखरुप सोडले आहे. दरम्यान वेळणेश्र्वर वाडदई येथे 10 दिवसांत बिबट्याने बैल आणि गाय मारली. अडूर, पिंपर परिसरातील लोकवस्तीत बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे तालुक्यातील विविध गावात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे.
सुरळ मोहल्ला येथील सार्वजनिक विहीरीमध्ये बिबट्या पडला असल्याचे 21 फेब्रुवारीला सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात आले. बहुदा हा बिबट्या रात्री उनाड कुत्र्याचा पाठलाग करीत लोकवस्तीत शिरला असावा. पाठलाग करताना किंवा सावजावर झेप घेताना हा बिबट्या थेट विहिरीत कोसळला. सकाळी ग्रामस्थांनी पाहिले तेव्हा बिबट्या तोंडात पाईप पकडून आणि पायाच्या आधाराने विहिरीच्या भिंती धरुन पाण्यात पडण्यापासून आपला बचाव करत होता.
सुरळचे सरपंच यांनी बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती वनपाल संतोष परशेटे यांना दिली. त्यानंतर विभागीय वनअधिकारी दिपक खाडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल अधिकारी आर. आर. पाटील, वनपाल परशेट्ये, देवरूखचे वनपाल उपरे, वनपाल रामदास खोत, वनरक्षक मांडवकर, शिंदे, बंबर्गेकर पिंजऱ्यासह सुरळ गावात दाखल झाले. विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने प्रयत्न सुरू केला. सुरुवातीला दोरीच्या साह्याने विहिरीमध्ये फळी सोडण्यात आली. अथक प्रयत्नांनतर बिबट्या या फळीवर उभा राहीला. थोड्यावेळाने आपण फळीवर सुरक्षित असल्याचे जाणिव झाली आणि बिबट्या फळीवर बसला. मग सावकाश फळी ओढून बिबट्याला विहिरीतून सुरक्षितरित्या वर काढले. आणि सोबत आणलेल्या पिंजऱ्यात जाण्यास भाग पाडले.
रात्रीपासून पाण्यात पोहून थकल्याने, भिजल्याने बिबट्या पिंजरात जाईपर्यंत शांत होता. मात्र आपण पिंजऱ्यात अडकल्याचे लक्षात येताच तो चिडला. त्याने डरकाळी फोडली. त्यावेळी मात्र ग्रामस्थांची चांगलीच धावपळ उडाली. अखेर बिबट्याचा पिंजरा वनखात्याच्या गाडीत टाकण्यात आला. त्याला चिपळूण तालुक्यातील जंगलामध्ये सोडण्यात आल्याची माहिती गुहागरचे वनपाल श्री. परशेटे यांनी दिली.
दरम्यान १० दिवसांपूर्वी वेळणेश्वर – वाडदई खालचीवाडी येथील संगीता भिकू गावणंग यांच्या गोठ्यातील बैल बिबट्याने मारला होता. शनिवारी २० फेब्रुवारी २०२१ ला रात्री त्याच संगीता भिकू गावणंक यांच्या गोठयातील गाय बिबट्याने मारली. याची माहितीही ग्रामस्थांनी वनखात्याला दिली. त्यानंतर वेळणेश्वरच्या जि. प. सदस्या नेत्रा ठाकूर, माजी सरपंच नवनीत ठाकूर, विनायक कांबळे व वाडीतील ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांच्या सहाय्याने पंचनामा केला. हा गोठा लोकवस्तीत असल्याने बिबट्याच्या दहशतीने परिसरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अडुर, पिंपर परिसरातील लोकवस्तीत काही ग्रामस्थांनी बिबट्याला पाहिले आहे. काळोख पडल्यावर बिबट्या शिकार करण्यासाठी वस्तीत शिरत असल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे.