28.8.2020
गुहागर : मुंबई-गोवा महामार्गावरील पर्शुराम ते लांजा पर्यंतचे 120 किमीच्या रस्त्याची चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांमुळे महामार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. आपल्या सोयीनुसार काम करणार्या आणि जनतेच्या जीवाशी खेळणार्या ठेकेदाराला भर रस्त्यात चाबुकाने झोडले पाहिजे. अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी पत्रकारांजवळ व्यक्त केली आहे.
गुहागर दौऱ्यावर असताना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी पत्रकारांची भेट घेतली. त्यावेळी मुंबई गोवा महामार्गावरील कामाबाबतचा विषय निघाल्यावर कदम म्हणाले की, 2017 मध्ये महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरवात झाली. दीड वर्षात काम पूर्ण करुन देऊ असे त्यावेळी ठेकेदाराने सांगितले होते. परंतु गेल्या 4 वर्षात महामार्गाचे 10 टक्के कामही झालेले नाही. त्यातच गेले पाच ते सहा महिने काम ठप्प आहे. पावसाळ्यापुर्वी किमान चिपळूण शहर परिसरातील रस्ता सुस्थितीत केला जाईल अशी शहरवासियांना आशा होती. मात्र ठेकेदाराने शहरातील रस्ता केला नाहीच शिवाय खड्डेही भरले नाहीत. त्यामुळे शहरातील महामार्ग धोकादायक बनदला आहे. दरम्यान गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरचे खड्डे बुजवण्याचे आदेश येताच ठेकेदाराने शहर परिसरातील दुर्दशा झालेल्या महामार्गावर भर पावसात डांबर-खडीने पॅच मारले. मात्र पावसात ते खड्डे पुन्हा उखडले आहेत. या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात घडत आहेत. ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या मनमानी कामामुळेच महामार्गाचे काम रखडले आहे. जुन्या रस्त्याची देखभाल करण्याचे काम ठेकदार करतोय. शासन पैसे देतय. मग संबंधित खात्याचे अधिकारी काय करतात. त्याच्यावर कोणाचे लक्ष आहे का, शहरातील महामार्गाच्या कामाकडे कोणी गंभीरपणे पहाणार आहे का. असे प्रश्र्न जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी उपस्थित केले आहेत.