गुहागर: राज्य उत्पादन शुल्क विभागातून पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झालेले सुभाष जाधव देवघर पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी तयार करत आहेत. मोफत प्रशिक्षणासाठी त्यांनी सामाजिक माध्यमांतून आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद मिळाला असून आज ३ गावातील ३२ मुले या प्रशिक्षणाला येवू लागली आहेत.
कोरोनाचे संकट संपल्यावर राज्यात शासकीय भरतीला सुरवात होणार आहे. अशा भरती प्रक्रियेत कोकणातील मुलांनी सहभागी व्हावे. पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन केले जाईल. असा एक संदेश सुभाष जाधव यांनी मोबाईलवर पाहिला. खरतरं सुभाष जाधव वर्षभरापूर्वी सेवा निवृत्त झाले. गिमवी गावात आपणही काहीतरी व्यवसाय सुरु करावा म्हणून त्यांनी गावातील जागेत हॉटेल बांधायला सुरवात केली आहे. पण पोलीस दलात आयुष्य गेल्याने पोलीस भरतीबाबतचा हा संदेश त्यांना अस्वस्थ करुन गेला. पोलीस दलात काम करत असल्याने कवायत, धावणे, व्यायाम आदींचे प्रशिक्षण आपणही देवू शकतो. गावातील मुलांना हे प्रशिक्षण दिले. भरती प्रक्रियेसाठी मार्गदर्शन केले. तर आपल्या गावातील मुलांना नोकरी मिळणे सोपे जाईल. असा विचार करुन त्यांनी मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. सामाजिक माध्यमांमधुन आवाहन केले. तसेच सैन्य व पोलीस दलातून निवृत्त झालेल्या मंडळींनाही शिकविण्यासाठी या असे आवाहन केले. सुभाष जाधव यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळू लागला. पहिल्या दिवशी दहावी, बारावीत शिकणारी 12 मुले, दुसऱ्या दिवशी 16, तिसऱ्या दिवशी 25 व झोंबडी आणि कौंढर मधील 7 अशी 32 मुले आता त्यांच्याकडे प्रशिक्षणाला येवू लागली आहेत.याबाबत सुभाष जाधव म्हणाले की, आज मी स्वत: प्रशिक्षण घेत आहे. मुले नियमित येऊ लागली तर त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन देण्याची व्यवस्थाही मी करणार आहे. आपल्या गावातील, परिसरातील मुलांसाठी आपण काही केले याचे समाधान मिळेल. एवढाच या प्रशिक्षणामागचा हेतू आहे.