राजेंद्र आरेकर, ज्ञानरश्मी वाचनालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
गुहागर, ता. 25 : शहरातील ज्ञानरश्मी वाचनालयाच्या नूतन वास्तूचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा प्रजासत्ताक दिनाचे दिवशी होणार आहे. या वर्षी वाचनालया समोर तिरंगा फडकविण्याचा मान दहावीमध्ये शहरात तृतीय आलेल्या प्रफुल्ल साटले या विद्यार्थ्याला देण्यात येणार आहे. अशी माहिती ज्ञानरश्मी वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर यांनी दिली आहे.
70 वर्षांपूर्वी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गुहागर शहरातील ज्ञानरश्मी वाचनालय सुरु झाले. या वाचनालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा ही 26 जानेवारीलाच होत आहे. या सोहळ्याच्या नियोजनाविषयी राजेंद्र आरेकर म्हणाले की, देशाचे भवितव्य ज्यांच्या कारकीर्दीत घडणार आहे त्यांना राष्ट्रध्वज फडकविण्याचा मान द्यावा असा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत झाला. गुहागर हायस्कुलमध्ये दहावीच्या परिक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले दोन्ही विद्यार्थी आज शिक्षणासाठी बाहेरगावी गेले आहे. तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला प्रफुल्ल साटले गुहागरमध्ये रहातो. त्यामुळे हा सन्मान त्याला देण्याचे आम्ही निश्चित केले आहे. नव्या वास्तुचे उद्घाटन उद्योजक श्रीराम नारायण खरे यांच्या हस्ते आम्ही करणार आहोत. त्यांचे वडिल कै. ना. ह. खरे ज्ञानरश्मी वाचनालयाचे अध्यक्ष होते. वाचनालयाच्या प्रवासात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ही वास्तू शहरातील नागरिकांसह, तालुक्यातील वाचक, विद्यार्थी या सर्वांची आहे. त्यामुळे उद्घाटन झालेल्या वास्तूचे लोकार्पण आम्ही करणार आहोत. गुहागरचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष राजेश बेंडल यांना दासबोध देवून हा लोकार्पण सोहळा आम्ही करणार आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्षांची निवड करताना यावर्षी ज्यांची पुस्तके प्रकाशनाच्या उंबरठ्यावर आहेत अशा व्यक्तिची निवड करायवयाचे ठरले. खरे ढेरे महाविद्यालयातील प्राध्यापिका सौ. मनाली बावधनकर यांची दोन पुस्तकांचे प्रकाशन पुढील दोन महिन्यात होणार आहे. त्यामुळे या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्षपद सौ. बावधनकर मॅडम यांच्याकडे आम्ही सोपविले आहे. या सोहळ्याला शहरवासीयांनी उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी राजेंद्र आरेकर यांनी केले आहे.