गुहागर : येथील खातू मसाले उद्योगचे मालक शालिग्राम खातू आणि कुटुंबियांनी अयोध्येत होणारा राम मंदिरासाठी दोन लाखाचा सहयोग निधी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्त केला आहे.
सध्या संपूर्ण देशात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातर्फे जनजागृती आणि समर्पण निधी संकलनाचे काम सुरु आहे. गावात, वाडीत जावून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कार्यकर्ते 492 वर्षांच्या संघर्षानंतर प्रत्यक्षात श्रीराम मंदिराच्या उभारणीचे कार्य सुरु झाल्याची माहिती देत आहेत. तसेच वाडी व गावातील कार्यकर्त्यांनी रामसेवक बनून ही माहिती असलेले पत्रक प्रत्येक घरात द्यावे असे आवाहनही करत आहेत. पत्रक देताना ग्रामस्थांकडून प्रभु रामचंद्रांच्या मंदिरासाठी कोणी निधी देत असेल तर पावती देवून हा निधीही स्विकारला जात आहे.
श्रीराम मंदिरासाठी निधी हा आग्रहाचा विषय नाही. मात्र दानाची परंपरा असलेल्या समाजामधून उत्स्फुर्तपणे कार्यकर्त्यांकडे निधी दिला जातो. त्यामुळे या निधीला सहयोग निधी म्हणून संबोधले जाते. अशाच प्रकारे गुहागरमधील खातू मसाले उद्योगाचे मालक शालिग्राम खातू यांनी कुटुंबाजवळ चर्चा करुन तब्बल दोन लाखाचा सहयोग निधी श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणासाठी तीर्थक्षेत्र न्यासाकडे सुपूर्त केला. यावेळी गुहागर तालुक्याचे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे प्रमुख ह.भ.प. सुमंत भिडे, मार्गदर्शक मोहनभाई संसारे, प्रचार प्रमुख मनोज बावधनकर, गुहागर मंडलातील कार्यकर्ते प्रथमेश दामले, कौस्तुभ दिक्षित आणि खातू मसाले उद्योगाचे सल्लागार दत्तेसाहेब उपस्थित होते.