पानिपतकार विश्र्वास पाटील; आध्यात्मिक सुख समाधान साहित्यांतून मिळते
गुहागर, ता. 22 : मराठी भाषा ही ग्रंथांनी समृध्द केली आहे. मराठीच्या सर्व छटा आपल्या साहित्यात मिळतील. मेंदुला थंडावा देण्याचे सामर्थ्य शब्दात आहे. एका मर्यादेनंतर देवालये, डॉक्टर वैद्य आणि धर्म थांबतात. खऱ्या अर्थाने देव, समाधान आणि सूख आपल्याला ग्रंथ देवू शकतात. म्हणूनच ग्रंथालयाची चळवळ गावागावात पोचली पाहिजे असा अट्टाहास माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी धरला. असे प्रतिपादन पानिपतकार विश्र्वास पाटील यांनी केले. ते ज्ञानरश्मी वाचनालयाच्या डॉ. तानाजीराव चोरगे सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
गुहागरमधील ज्ञानरश्मी वाचनालयातील डॉ. तानाजीराव चोरगे सभागृहाचे उद्घाटन पानिपतकार विश्र्वास पाटील यांनी केले. यावेळी मराठी साहित्य परिषद, पुणे शाखेचे कार्याध्यक्ष, लेखक व वक्ते प्रा. मिलिंद जोशी, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे अध्यक्ष, कवी व समिक्षक अरुण इंगवले, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे कार्याध्यक्ष, म.सा.प. कोकण विभाग प्रमुख, इतिहास संशोधक प्रकाश देशपांडे, गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल उपस्थित होते.
यावेळी विश्र्वास पाटील म्हणाले की, कोकणाने अनेक साहित्यिक मराठी साहित्याला दिले. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी व्यक्तित्वांची ओळख आपल्याला साहित्यिकांनी करुन दिली. पण हे साहित्यिकच समाजात थोडे दुर्लक्षित असतात. पोलादपुरच्या स्वामी परमानंदांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक नोंदी आपल्या ग्रंथात करुन ठेवल्या होत्या. शाहीरांचे पोवाडे, बखरी, स्वामी परमानंदांच्या नोंदी यातून छत्रपतींचे चरित्र जगासमोर आले. पण त्यासाठी महाराष्ट्रातल्या नव्हे कोकणातल्या परमानंदांचे ग्रंथ आणण्यासाठी आपल्याला तामिळनाडू गाठावे लागले. तेथील इतिहासकारांनी परमानंदाच्या संस्कृत ग्रंथांचे तमीळ भाषांतर केले. ते आपण मराठीत करुन घेतले. आज याच स्वामी परमानंदाची पोलादपूरमधील दुर्लक्षित समाधी दहा बारा लाखाच्या निधीची वाट पहात आहे. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
काहीजण विचारतात कशाला एवढं वाचायला पाहिजे. लेखन, वाचन ही भाषेची आराधना आहे. सातत्याने वाचत राहील तर आपल्या भाषेची श्रीमंती वाढते. मराठी भाषा ही वळवावी तशी वळते. त्यातून नव्याने काहीतरी हाती लागतं. महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे आणि यशवंतराव चव्हाण या तीन व्यक्तींची व्यक्तिगत ग्रंथालये आदर्श होती. या तिघांचा ग्रंथसंग्रह भव्य होता. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांमुळे महाराष्ट्रातील अनेक गावात, तालुक्यात वाचनालये सुरु झाली. 2005 पर्यंत महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयात, वाचनालयात दुर्मिळ ग्रंथ अभ्यासासाठी, संदर्भांसाठी उपलब्ध होते. नव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरु करुन अनेक ग्रंथ संगणकीकृत करणाऱ्या कंत्राटदारांकडे गेले. दुर्दैवाने त्यानंतर हे ग्रंथ वाळवी लागू नये म्हणून कचऱ्यात फेकले गेले, रद्दी म्हणून विकले गेले. आज अनेक ग्रंथालयात दुर्मिळ ग्रंथ उपलब्ध नाहीत. ग्रंथाची जपणूक, ठेवणूक, ग्रंथांचे संकलन करणे, त्यांचा प्रसार ही सरस्वतीची आराधना आहे. गेलेली पुस्तके परत येत नाहीत ही वाचनालयांची मोठी समस्या आहे. ज्ञानमंदिराची काळजी घेणं हे शिवधनुष्य आहे. आज कॉम्प्युटर युगामुळे वाचनाचे स्वातंत्र्य मिळाले आहे. विविध विषयांचा ज्ञान मिळण्याची सुविधा आपल्या हातात आहे. ज्ञानरश्मीने वाचन कक्षाबरोबरच स्पर्धा परिक्षा अभ्यासकेंद्र सुरु करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये अनेक विद्यार्थी अशा केंद्रांमधुन आपले भविष्य घडवत आहेत. ग्रंथसेवेबरोबरच वाचन संस्कृती वाढविण्याबरोबरच येथील विद्यार्थ्यांना हे स्पर्धा केंद्र उपयोगी ठरो. वाचनालय म्हणजे आपल्या गावातील लक्ष्मी सरस्वतीचे मंदिर आहे. या मंदिरातील विविध साहित्यकृतींचे रक्षण करण्याची जबाबदारी शब्दांवर प्रेम करणाऱ्या तुम्हा आम्हा सर्वांची आहे. ही आराधना अशीच चालु रहावी. अशा शुभेच्छा यावेळी विश्र्वासराव पाटील यांनी दिली.
घरातून वाचन संस्कृती हद्दपार होण्याची भिती – प्रा. मिलिंद जोशी
मराठी साहित्य परिषद, पुणे शाखेचे कार्याध्यक्ष, लेखक व वक्ते प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, भाषा, साहित्य आणि संस्कृती टिकायची असेल तर शिक्षकांवर आहे. पुढची पिढी वाचन नाही अशी तक्रार करत असू तर त्यात काही अर्थ नाही. वडिलधारी माणसे वाचत नाहीत म्हणून मुले वाचत नाहीत. घरातील प्रत्येक वडिलधाऱ्यांनी मुलांसमोर वाचत बसेल पाहिजे. म्हणजे मुले कुतुहलाने पुस्तकावरुन हात फिरवतील. पुस्तकाबद्दल त्यांच्या मनात आकर्षण निर्माण होईल. तो संस्कारच त्यांना वाचक बनवेल. पुर्वी प्रत्येक घरातील एक व्यक्ती वाचनालयाची आजीव सभासद होती. त्या व्यक्तीनंतर त्यांच्या पुढची घरातील व्यक्ती वाचनालयशी जोडली जायची. आज ही साखळी तुटली आहे.
आज दुर्दैवाची परिस्थिती निर्माण झाली आहे की आपल्या घरातूनच ग्रंथसंस्कृती हद्दपार होत आहे की काय अशी भिती वाटू लागली आहे. पूर्वी घरात स्त्रोत्र ऐकायला यायची, किर्तन प्रवचन व्हायची. तीथे आजीआजोबा आपल्या नातवाला घेवून जायचे. आज परिस्थिती बदलली आहे. घराचा ताबा दुरचित्रवाणीने घेतला आहे. आई वडिल नोकरी आणि करियरच्या चक्रात अडकली आहेत. मुल सकाळी क्लास, दुपारी शाळा, सायंकाळी क्लास अशा चक्रात अडकली आहेत. एकमेकांमधला संवाद हरपला आहे. वाचनाला तर घरात स्थानच राहीलेले नाही. त्यामुळे वाचन संस्कृतीची पालखी ज्यांच्या खांद्यावर आहे असे भावी वाचकच जर आपण तयार झाले नाहीत तर पुढच्या पिढ्या पालकांना, शिक्षकांना क्षमा करणार नाहीत.
उद्याचा नागरिक प्रगल्भ व्हावा असे वाटत असेल तर ही ज्ञानमंदिरे अधिक समृध्द झाली पाहिजेत. साऱ्या समाजाची पावले या ज्ञानमंदिरांकडे वळली पाहिजेत. साहित्याभिमूख आणि समाजाभिमूख अस ग्रंथालय असेल तर ते पुढे जाईल. भाकरी ही पोटाची गरज आहे. पण भावना जागवायला आणि मन फुलवायला विचारचं उपयोगी पडतात. हे विचार साहित्यातूनच मिळतात. शरीरसाठी आवश्यक असणारी जीवनसत्त्व अन्नातून मिळतात. तसचं मन आणि बुध्दीसाठी आवश्यक जीवनसत्त्व साहित्यातून मिळतात. एकेका शब्दांने माणसांची आयुष्य बदलून जातात. ही साहित्याची ताकद आहे. वाचन ही गंभीरता पूर्वक करण्याची प्रक्रिया आहे.
ग्रंथाना प्राधान्य नाही त्या समाजाचे पुढे काय होणार हा एक मोठा प्रश्र्न आहे. तुम्ही इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, वकिल व्हा. तुम्ही साहित्याशी जुळलेले असेल पाहिजे. आज समाजाच्या सर्व क्षेत्रातील माणसे लिहिलायला लागली आहेत. एकेकाळी साहित्य निर्मितीचा ठेका केवळ मराठीच्या प्राध्यापकांकडे होता. पण आजतर मराठी साहित्यामध्ये ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागातील लेखक, कवी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अशा लेखकांना, कवींना वाचनालयांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. सार्वजनिक वाचनालयांच्या सभागृहांमध्ये व्याख्याने झाली पाहिजेत. शब्द शक्तीच्या अफाट ताकदीचा विलक्षण आविष्कार अशा व्याख्यानांमधुन अनुभवायला मिळतो. सांस्कृतिक सभागृह ही समाजाच्या बौध्दीक संस्कारांसाठी आवश्यक असतात. लेखक कागदावर लिहितात आणि वक्ते समाजाच्या काळजावर लिहितात. काळजावर कोरलेले एखादं वाक्य कायम लक्षात राहाते. भाषा आणि संस्कृतीची स्पंदने प्रथम मनामध्ये उमटतात आणि नंतर ती उच्चारातून आणि कृतीतून प्रगटतात. त्यामुळे आपले भाषाप्रेम केवळ दिखावुपणासाठी नाही. आपल्या मनातील मराठी प्रेमाची ज्योत टिकवून ठेवण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. आपण आपल्या संस्कृतीपासून का दूर जात आहोत याचे चिंतन केले पाहिजे. पंत प्रतिनिधी, धोंडो केशव कर्वे, यशवंतराव चव्हाण यासारख्या माणसांमुळे साहित्य संस्था टिकविल्या. आज वाचन संस्कृती टिकविण्यासाठी तरुणांची पावले ग्रंथालयाच्या दिशेने येतील हे पाहिले पाहिजे. त्यासाठी त्यांना आवडणारे लेखक, त्यांच्या आवडीच्या विषयांवर बोलणारे यांना ग्रंथालयात आणले पाहिजे. ग्रंथालये आणि साहित्य संस्था मोठ्या व्हायच्या असतील तर समाजाने खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहीले पाहिजे.
अन्य मान्यवरांची मनोगते
लोटिस्माचे अध्यक्ष अरुण इंगवले यांनी लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, ज्ञानरश्मी वाचनालय ही सख्खी भावंडे असल्याचे सांगितले. तर लोटिस्माचे कार्याध्यक्ष यांनी गुहागर तालुक्यातील साहित्यिकांची माहितीला या कार्यक्रमाच्या निमित्ताने उजाळा दिला. ते म्हणाले की उत्साही वातावरणात ज्ञानरश्मी वाचनालय उभं रहाते. सुर्यासारखे तेजस्वीपणे महाराष्ट्रात तळपत राहो. 45 वर्षांपूर्वीपासून हे वाचनालय अनुभवलयं. भाऊ साठे सारख्या माणसांनी हे वाचनालयं जपलयं. गुहागर तालुक्याला समृध्द साहित्याचा वारसा आहे. ज्यांच्या शब्दात मुजरा करण्याचे सामर्थ्य होते असे नाटककार वासुदेवशास्त्री खरे. समिक्षक लिला दिक्षित, इतिहासकार ग. ह. खरे हे गुहागरमधील. वहिनींच्या बांगड्या सारख्या गाजलेल्या चित्रपटांचे लेखन करणारे यदु जोशी भातगावचे. मराठी साहित्यामध्ये मराठी कविता विख्यात केली ते कवी माधव काटदरे शीरचे होते. अशा तालुक्यातील ज्ञानरश्मी वाचनालयाचे हे नवेपण पुन्हा एकदा तरुण पिढीला साहित्याकडे वळवले.
गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल म्हणाले की, ज्ञानाचा प्रकाश देणारी वास्तू गुहागरसारख्या निसर्गरम्य आणि सांस्कृतिक परंपरा जोपासणाऱ्या गावात आहेत. ही आमच्यासाठी अभिमानाची आहे. संस्था वाढविणे, जगवणे, तिचा विकास करणे यासाठी किती परिश्रम घ्यावे लागतात हे सर्वांनाच माहिती आहे. राजेंद्र आरेकर यांनी वाचकांबरोबर विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केंद्रही उभे केले आहे. या केंद्राचा फायदा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी करुन घेतला पाहिजे. साहित्य संमेलने आणि मोठे कार्यक्रम सोडले तर राजकारण्यांचा साहित्याशी फारसा संबंध नसतो. कवी, लेखकांच्या लिखाणातही सामान्य व्यक्तीं सह डॉक्टर असतो, वकीलही असतो. त्यांच्याबाबत कौतुकाचे चार शब्द लिहिले जातात. मात्र राजकारण्यांवर व्यंगचित्र आणि टिकेखेरीज काही वाचायला मिळत नाही. जर साहित्यिकांनी राजकारणावरही चांगल्या गोष्टी लिहायला सुरवात केली तर नवी, वाचणारी, पिढी राजकारणात येण्यास मदत होईल.
ज्ञानरश्मी वाचनालयाच्या डॉ. तानाजीराव चोरगे सभागृह नामकरण आणि तैलचित्र अनावरण कार्यक्रमाला गुहागरच्या उपनगराध्यक्षा सौ. स्नेहा भागडे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉ. अनिल जोशी, डॉ. निला नातू, ज्ञानरश्मी वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर, सेक्रेटरी सौ. अरुणा पाटील, संजय मालप, श्रीमती शामल बारटक्के, ज्ञानेश्र्वर झगडे, प्रा. सौ. मनाली बावधनकर, ॲड. संकेत साळवी, कवी राष्ट्रपाल सावंत, लेखक प्रा. संतोष गोणबरे, ईश्वरचंद्र हलगरे, विवेकानंद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष वरंडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन बाबासाहेब राशिनकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रंथपाल सौ. सोनाली घाडे, मदतनीस शामली घाडे, अश्विनी जोशी यांनी मेहनत घेतली.