राजेश बेंडल; ज्ञानरश्मी वाचनालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन
गुहागर, ता. 28 : ज्ञानरश्मी वाचनालय म्हणजे गावाची शान आहे. सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या हा वास्तुचा जीर्णोद्धार होवून आजच्या काळाला योग्य अशी इमारत उभी राहीली ही गुहागर शहरवासीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. असे प्रतिपादन नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी केले. तर श्रीराम खरे यांनी ज्ञानरश्मी वाचनालयाला सर्वतोपरी सहकार्य करु. असे आश्र्वासन दिले. गुहागर शहरातील ज्ञानरश्मी वाचनालयाच्या नूतन वास्तुचे उद्घाटन 26 जानेवारीला झाले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात राजेश बेंडल व उद्योजन श्रीराम खरे बोलत होते.
गुहागर शहरातील ज्ञानरश्मी वाचनालयाचे उद्घाटन 26 जानेवारी 1950ला महादेव भावे यांनी केले. त्यांच्या पत्नी वाराणसी भावे यांच्या इच्छेखातर महादेव भावे यांनी हे वाचनालय उभे केले. मात्र पत्नीचे किंवा स्वत:चे नाव वाचनालयाला न देता ज्ञानरश्मी वाचनालय हे नाव देण्याचा आग्रह देखील भावे कुटुंबानेच त्याकाळी धरला होता. 70 वर्षांपूर्वी बांधलेल्या या वाचनालयाची इमारत कालसुसंगत बनणे आवश्यक होते. त्यामुळे ज्ञानरश्मी वाचनालयाच्या संचालक मंडळाने जुन्या इमारतीच्या ठिकाणी नवी इमारत बांधली. अवघ्या वर्षभरात नवी इमारत उभी राहीली. या इमारतीचे उद्घाटन गुहागरचे सुपुत्र आणि लोटे एमआयडीसीतील कारखानदार, नवकोंकण एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्रीराम खरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्घाटन समारंभात बोलताना श्रीराम खरे म्हणाले की, माझे वडिल ना. ह. तथा नाना खरे यांनी या वाचनालयासाठी तनमनधनपूर्वक योगदान दिले आहे. जेव्हा वाचनालयांना शासनाकडून निधीही मिळत नव्हता अशा काळात हे वाचनालय सुरु ठेवण्याचे आव्हान नानांसह अनेक मंडळींनी पेलले. आज या वाचनालयाची नूतन वास्तू उभी रहात आहे. या वाचनालयाला सर्वोतपरी मदत मी करत राहीन.
उद्घाटनप्रसंगी बोलताना नगराध्यक्ष राजेश बेंडल म्हणाले की, ज्ञानरश्मी वाचनालय म्हणजे गुहागर शहराचा सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. गुहागरची ओळख असणाऱ्या हा वाचनालयाच्या नव्या इमारतीत ज्ञानदानाचे अनेक कक्ष निर्माण होणार आहेत. त्याचा फायदा येथील विद्यार्थ्यांसह नागरिकांना होईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सौ. मनाली बावधनकर यांनी वाचनालयाचा इतिहास सर्वांना सांगितला. स्वातंत्रवीर सावरकर, आचार्य अत्रे, सुशीलकुमार शिंदे, अरुणाताई ढेरे अशा अनेक महनीय व्यक्तींच्या पदस्पर्शाने ही वास्तू पावन झाली आहे. अनुदान मिळत नसतानाही गावकऱ्यांनी हे वाचनालय नुसते जपले नाही तर वाढवले. म्हणूनच आज विविध विषयांची 30 हजारपेक्षा जास्त पुस्तके आज वाचनालयात उपलब्ध आहेत. आज विविध उपक्रमांद्वारे वाचन संस्कृती वाढविण्याचे काम ज्ञानरश्मी वाचनालय करत आहे. वाचनालय आपल्या शाळेत या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळांना ज्ञानरश्मी वाचनालयाचे कार्यकर्ते भेट देतात. शाळेतील मुलांना दिवसभर पुस्तके वाचायला देतात. जवळपासच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दोन तीन तास वाचनालयात आणतात. दरवर्षी 5 विद्यार्थ्यांना बाल वाचक पुरस्काराने सन्मानित केले जाते. याशिवाय कविता वाचन, कथा वाचन, परिसंवाद असे विविध कार्यक्रम महिन्यातून एकदा वाचनालयात घेतला जातो. अशी माहिती सौ. मनाली बावधनकर यांनी दिली.
ज्ञानरश्मी वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर यांनी जुन्या इमारतीचा जीर्णोद्धाराचा प्रवास सीआरझेड कायद्यासारख्या अनंत अडचणींमधुन कसा झाला याची माहिती उपस्थितांना दिली. वाचनालय हे गावाचे वैभव असून नव्या इमारतीमध्ये बाल कक्ष, महिला कक्ष, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी संगणकांची सुविधा असलेला कक्ष, वृत्तपत्र कक्ष, वाचन कक्ष अशी विविध दालने असतील. या वाचनालयाच्या माध्यमातून एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी. सारख्या परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांनी करावी. असे आवाहन यावेळी राजेंद्र आरेकर यांनी केले.
उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने सौ. हेमांगी सुरज खातू यांनी वाचनालयाला 700 पुस्तकांची भेट दिली. यावेळी वाचनालयातर्फे देणगीदार, हितचिंतकांचा तसेच वाचनालयाला सर्वोतोपरी मदत करणाऱ्या गद्रे कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.