गुहागर पोलीस, कौटुंबिक कारणांमुळे गेली होती घर सोडून
गुहागर, ता. 28: सलग दुसर्यांदा 72 तासांच्या आत बेपत्ता तरुणीचा (Missing girl) शोध लावून तिला घरी परत आणण्यात गुहागर पोलिसांना (Guhagar Police) यश (Successful Investigation) आले आहे. गुहागर पोलीसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
गुहागर तालुक्यातील वेलदुर गावातील श्रुती पड्याळ ही 22 वर्षीय तरुणी मंगळवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी सकाळी घरातून बेपत्ता झाली होती. सदर तरुणीचा शोध घरची मंडळी विविध मार्गांनी घेत होती. मात्र 25 सप्टेंबर पर्यंत या तरुणीचा शोध लागला नाही. तेव्हा तरुणीचे वडील विजय पड्याळ यांनी गुहागर पोलीस ठाण्यात श्रुती पड्याळ बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
राज्यात याच आठवड्यात तरूणींवर अत्याचाराच्या तीन घटना नोंदवल्या गेल्या. त्याचवेळी गुहागर तालुक्यातील पाचेरी आगर आणि वेलदूर या दोन गावातून तरुणी बेपत्ता झाल्याच्या 2 तक्रारी नोंदवल्या गेल्या. दोन्ही तक्रारींमध्ये एक साम्य होते. दोन्ही तरूणी एकाच दिवशी घरातून बाहेर पडल्या होत्या. त्यामुळे गुहागर पोलीसांवर दोन्ही तक्रारींची उकल करण्याचे आव्हान होते. दडपण आणि दबाव होते.
पाचेरी आगर येथील बेपत्ता तरूणीचा शोध 24 तासांच्या आत गुहागर पोलिसांनी लावला. त्यामुळे पोलीसांचा हुरूप वाढला. वेलदूर मधील तरुणीचा शोध घेण्याचे काम गुहागर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक बी. के. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकाँस्टेबल वैभव होळव करत होते.
24 तासात शोधला बेपत्ता तरुणीचा पत्ता
पोलिसांना सोमवारी सदर तरूणी चिपळूणात गेल्याची माहिती मिळाली. चिपळूणात तपास केला असता या तरुणीने गोव्याकडे जाणाऱ्या रेल्वेची चौकशी केली होती. म्हणून या दिशेने गेलेल्या रेल्वे गाड्यांची आरक्षणे तपासली. त्यात श्रुतीच्या नावाची नोंद मिळाली. तिने एकटीचेच तिकीट आरक्षित केले होते. त्यामुळे तिच्या बरोबर आणखी कोणी आहे किंवा नाही याची माहिती मिळत नव्हती. तिने गोव्याचे आरक्षण करून दिशाभूल केली असल्याची शक्यता नाकारता येणार नव्हती. मग गुहागर पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर केला. अखेर ती म्हापसा येथे असल्याचे निश्चित झाले. अवघ्या 72 तासात पोलिसांनी ती रहात असलेले घरातील कुटुंबाशी संपर्क साधला. श्रुती तत्काळ गुहागरला आली नाही तर कायदेशीर कारवाई करण्याची कडक समज दिली. महाराष्ट्र पोलीस, गोवा पोलीस यांच्याकडे आपल्या नावाची नोंद झाली तर अडचणी वाढतील. हे लक्षात आल्यानंतर श्रुती पड्याळ पुन्हा गुहागरला परतली. गुहागर पोलिसांनी केलेल्या चौकशीत कौटुंबिक कारणांमुळे श्रुतीने घर सोडल्याचे निष्पन्न झाले.
ही शोध मोहीम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.के जाधव आणि वैभव होळवे यांनी प्रयत्न केले.