गुहागर पोलीस ठाण्यात चारजणांविरोधात गुन्हा दाखल
गुहागर, ता. 21 : शृंगारतळी बाजारपेठेमध्ये वेळंब फाटा ते पेट्रोलपंप दरम्यान मनीषा कन्स्ट्रक्शनतर्फे गुहागर विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे रस्त्याचे काम सुरू आहे. 20 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 01:15 वा. येथे काँक्रिटीकरण सुरु असताना अभियंता नीरज वर्मा (वय 30, सध्या रहाणार झोंबडी फाटा) आणि रामजी राधेशामसिंग वर्मा या दोघांना सचिन मराठे, सचिन जाधव, अजित शिंगाडे व अनोळखी व्यक्ती अशा चारजणांनी मारहाण केली. याबाबत गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिव्हील इंजिनिअर निरजकुमार वर्मा (वय 30, मुळ गाव मुकुंदपुर, पोस्ट नंदापुर, ता. तांडा, जिल्हा आंबेडकरनगर, उत्तरप्रदेश, सध्या वास्तव्य मनिषा कन्स्ट्रक्शनची झोंबडी येथील वसाहत) यांनी गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्याप्रमाणे मनिषा कन्स्ट्रक्शनची टीम 20 फेब्रुवारीला रात्री वेळंब फाटा ते पेट्रोलपंप दरम्यान रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम करत होती. रात्री 1.15 वा. चार व्यक्ति काम सुरु असलेल्या ठिकाणी आल्या. त्यांनी अभियंता रामजी राधेशामसिंग वर्मा आणि सुपरवायझर अमरजित कुमार यांना काम बंद करण्यास सांगितले. कंपनीच्या मालकाला बोलावून घ्या. असे सांगून शिवीगाळ केली. झोंबडी येथून येणारे सिमेंट क्रॉक्रीटचे डंपर थांबवले. चालु काम का थांबवत आहात असे विचारण्यासाठी निरजकुमार तेथे गेले असता या चार व्यक्तींनी लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण केली. त्याच्यापैकी एकाने गटाराचे काम चालु असलेल्या ठिकाणावरुन लोखंडी सळी घेतली. ती व्यक्ति रामजी वर्मा आणि अमरजित कुमार यांना मारायला जात होती. निरजकुमारने त्यांना अडकविले. त्यावेळी लोखंडी सळीचा फटका निरजकुमार यांच्या कमरेवर बसला. अन्य एकाने तेथेच पडलेला दगड मारला. त्याने निरज कुमार यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर परत तुम्ही काम सुरु केलेत तर तुम्हाला बघुन घेवू. अशी धमकी देवून या चार व्यक्ती तेथून निघुन गेल्या.
काँक्रिटीकरणाचे काम करणाऱ्या टिमसोबत असलेले गणेश माने आणि महेश गोपीनाथ काताळकर यांनी निरजकुमार वर्मा, रामजी वर्मा आणि अमरजित कुमार यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. महेश काताळकर यांनी या चार व्यक्तिंमध्ये सचिन मराठे, सचिन जाधव, अजित शिंगाडे आणि एक अनोळखी इसम क्राँक्रिटीकरणाचे काम थांबविण्यासाठी आल्याचे सांगितले.
या तक्रारीवरुन गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पवार करीत आहेत.