वेळंब येथील घटना, दोन प्रवासी गंभीर जखमी, वानराचा मृत्यू
गुहागर : अचानक रस्त्यावर आलेल्या वानराचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात रिक्षेला अपघात झाला. या अपघात तीन प्रवासी जखमी झाले तर धडकेमुळे वानराचाही जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना वेळंब गावातील मळण फाटा येथे घडली. जखमी प्रवाश्यांपैकी दोन जणांना अधिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ऍपे रिक्षा क्रमांक MH 08 E 7543 वेळंब कडून शृंगारतळीकडे येत होती. ही रिक्षा नालेवाडी मळण फाटा येथे आली असता जंगलातून अचानक वानराने रस्तावर उडी मारली. समोर वानर दिसल्यावर ऍपे रिक्षा चालकाने वानराला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र वानर रिक्षावरच आदळला. यामध्ये रिक्षा पलटी झाली. रिक्षातील प्रवासी बाहेर फेकले गेले. तसेच रिक्षावर आदळलेला वानरही गतप्राण होवून तेथेच कोसळला. सदर अपघात मासुमधील सामाजिक कार्यकर्ते आनंद भोजने यांनी पाहिला. त्यांनी रिक्षामधील तिघांना आपल्या वाहनातून चिखली आरोग्य केंद्रात दाखल केले. वेळंबमध्ये रहाणारे रत्नु भागोजी खांडे (वय 50) यांना गंभीर इजा झाल्याने अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर श्र्वेता सुनील पिंपळे (वय 37) यांना कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. वैष्णवी देवजी घाडे (वय 35) यांना किरकोळ दुखापत झाली होती. चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. शशिकला वाडकर यांनी प्राथमिक उपचारांनंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली. अपघाताचे वृत्त कळतात रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मयु कोळवणकर, रुपेश भोसले, अनंत चव्हाण, दीपक रहाटे यांसह अनेक रिक्षा चालक चिखली आरोग्य केंद्रात मदतीस धावून आले.