कोकणातील पर्यटन समुद्रावरील दंगामस्ती शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यातही रत्नागिरी जिल्ह्यातील स्वच्छ आणि विस्तीर्ण समुद्रकिनारे हे पर्यटकांचे खास आकर्षण असते. त्याचसाठी पर्यटक मुरूड, हर्णै, कर्दे, आंजर्ले, केळशी, कोळथरे, गुहागर, वेळणेश्वर, हेदवी या ठिकाणी येतात, रहातात आणि निळाशारं आकाशाबरोबर, समुद्राची गाज ऐकत वाळुत खेळण्याचा अवर्णनिय आनंद अनुभवतात.आज सागरी महामार्गामुळे पर्यटकांसाठी हे सर्व समुद्रकिनारे जोडले गेले आहेत. शिवाय रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खाड्यांमध्ये फेरीबोट सेवा (दिघी-आगरदांडा, वेश्वी –बागमांडला, दाभोळ-धोपावे) उपलब्ध झाल्याने वाहनासह खाडी ओलांडण्याची सुविधाही प्राप्त झाली आहे. मंडणगड, दापोली आणि गुहागर तालुक्यातील समुद्रकिनारे जरी सारखे असले तरी प्रत्येक समुद्रकिनाऱ्याचे एक वैशिष्ठ्य राहीले आहे. त्यामुळेच हे समुद्रकिनारे पर्यटकांसाठी आकर्षणाचे स्थान आहे.
- वेळासचा समुद्रकिनारा – कासवांचा गाव
मंडणगड तालुक्यातील वेळासचा समुद्रकिनारा म्हणजे ऑलिव्ह रिडले ह्या समुद्री कासवांच्या संवर्धनाची जन्मभूमी. 2003 सालापासून ह्या समुद्री कासवांची अंडी संरक्षित करणे आणि जन्माला आलेली शेकडो कासवे समुद्रात सोडणे ही कामे तेथील गावकरी तन्मनयतेने करतात. दरवर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान वेळासला कासव महोत्सव साजरा केला जातो. हजारो पर्यटक हा कासव महोत्सव पहाण्यासाठी वेळासला येतात. या छोट्याश्या गावात लॉज किंवा हॉटेल नाही. परंतू घरगुती रहाण्याची व जेवण्याची सोय गावात होऊ शकते. (आज दापोली तालुक्यातील आंजले, कोळथरे, लाडघर व गुहागर तालुक्यातील गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरही कासव संवर्धन होते. या समुद्रकिनाऱ्यावर अंडी मिळण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. )


- केळशीचा समुद्रकिनारा – वाळूचा डोंगर
दापोली तालुक्यातील केळशीचा समुद्रकिनारा वाळुच्या डोंगरासाठी प्रसिध्द आहे. कोकणात असा वाळुचा डोंगर अन्यत्र दिसत नाही. केवड्याचे बन, शंख, शिंपले, कवड्या, समुद्रफेणी, निरनिराळ्या आकारांची समुद्रप्राण्यांची घरे ही देखील केळशीच्या समुद्रकिनाऱ्यावर पहायला मिळतात. याशिवाय पेशेवेकालीन वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेले सिध्दीविनायक गणपती मंदिरही केळशीमध्ये आहे.


- हर्णै – मासेमारीचे मुख्य केंद्र
विस्तीर्ण समुद्रकिनारा, नौका विहाराच्या माध्यमातून सुवर्णदुर्गाचे दर्शन, डॉल्फिन सफारी आणि माशांचा लिलाव अशा वैशिष्ट्यांनी हर्णै ओळखले जाते. त्याचबरोबर कनगदुर्ग, फतेगड अशा दोन गडांचे अवशेषही हर्णै गावात आढळतात. त्यामुळे हर्णै हे सागरी पर्यटनातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. मासेमारीचे मुख्य केंद्र असल्याने सायंकाळी 4 नंतर हर्णै बंदरात होणारा माशांचा लिलाव पहाण्यासारखा असतो. विविध प्रकारचे ताजे मासे खरेदी करण्याची हौसही येथे भागविता येते. शिवाय बोटींची दुरूस्ती देखील येथे होत असल्याने लहान मुलांचे संपूर्ण बोट पहाण्याचे कुतुहल येथे पूर्ण करता येते.


- कर्दे म्हणजे समुद्रपक्षांचे माहेर
थंडीच्या मोसमात दापोली तालुक्यातील कर्दे परिसरात हजारोंच्या संख्येने स्थलांतरीत समुद्रपक्षी (सी गल) येतात. त्यामुळे हजारो पक्षी तासन् तास पहाण्यात वेळ कधी निघून जातो ते समजत नाही. याशिवाय खोल समुद्रात जावून डॉल्फिन पहाण्याची संधी देखील कर्दे समुद्रकिनाऱ्यावर उपलब्ध आहे.


- मुरूड – ॲडव्हेंचर स्पोटर्स
पॅरासिलींग, स्पिड बोट, बनान बोट, सॅन्ड स्कुटर, उंट सफर अशा विविध सोयी मुरूडच्या समुद्रकिनार्यावर उपलब्ध आहेत. किनार्यालगतच निवासाची व्यवस्था असल्याने मुरूडचा समुद्रकिनारा पर्यंटकांनी कायम फुललेला असतो. याशिवाय मुरूड मध्ये महर्षी कर्वे यांचे स्मारक आहे. महर्षि कर्वेंची दुर्मिळ छायाचित्र, जीवनपट ह्या स्मारक पहाता येतो.
- गुहागर : लोककला आणि खाद्यसंस्कृती
गुहागरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा देखील पर्यटकांना भुरळ पाडतो. येथील समुद्रकिनाऱ्यावर जीवरक्षक (लाईफगार्ड) तैनात असल्याने अनेक पर्यटक गुहागरला प्राधान्य देतात. गुहागरच्या समुद्रकिनार्यावरही स्पिड बोट, बनान बोट, सॅन्ड स्कुटर या साहसी खेळांचा आस्वाद घेता येतो. समुद्रकिनार्यावर प्रवेश करतानाच सुरूंचे विस्तिर्ण बन असल्याने आल्हाददायक थंडावा आणि समुद्रवारा अंगावर घेता येतो. याचठिकाणी खाऊगल्लीप्रमाणे अनेक दुकाने असल्याने समुद्रावरच जेवण्याचा आनंदही मिळतो.
गुहागरमध्ये रहाण्यासाठी महागड्या हॉटेल्सपासून खिशाला परवडणारी हॉटेल्स, घरगुती रहाण्याची सोय येथे उपलब्ध आहे. या रेस्टॉरंटसह शहरातील विविध घरगुती खानावळींमध्ये शाकाहारी (मोदक, वडे घाटले, कुळथाचे पिठले) आणि मासांहारी (ताजे मासे, भंडारी पध्दतीचे मटण) जेवणाची उत्तम सोय असल्याने कोकणातील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेता येतो. गुहागरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येतील लोककला. संकासुराचा नाच, शक्ती तुरा अशा लोकसंस्कृतीचा आनंद लुटण्याची व्यवस्था येथील हॉटेल व्यावसायिक करतात.
गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथेही विस्तीर्ण समुद्रकिनारा आहे. समुद्रकिनाऱ्याशेजारी काळभैरव, वेळणेश्र्वर आदी मंदिराचा देखणा समुह आहे. हेदवीला फार मोठा समुद्रकिनारा नाही. परंतु समुद्रावरील अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले उमा महेश्वरचे मंदिरात विसाव्याचे दोन क्षण आनंदात जातात. ह्या मंदिरामागे असलेली बामणघळ म्हणजे निसर्गाचा चमत्कारही आपल्याला पहाता येतो. प्रसिध्द दशभुज लक्ष्मीगणेशाचे दर्शन हेदवीत होते.
दाभोळच्या खाडीत नौकाविहाराची सोय उपलब्ध आहे. या नौकाविहारामध्ये तुम्हाला दाभोळच्या खाडीमध्ये 1 तास फीरता येते. तवसाळला ॲन्गलिंक फिशिंगचा छंद असणाऱ्यासाठी खाडी किनारी रहाण्याची व्यवस्था आहे. अशा पध्दतीने वेळासपासून हेदवीपर्यंत विविध वैशिष्ट्यांनी पूर्ण असे सागरी पर्यटन आपण करु शकतो. विस्तीर्ण समुद्रकिनारा, निसर्ग सौंदर्य, पक्षी दर्शन, लोककला इत्यादी विविध अंगांनी हे सागरी पर्यटन आपण आज करु शकतो. सागरी महामार्ग, मुंबई गोवा महामार्ग, गुहागर विजापूर महामार्गाचे काम पूर्णत्वास जात असल्याने प्रवास करणे देखील आज आरामदायी झाले आहे. निसर्ग नियमात चुकीला माफी नाही. त्यामुळे सागरी पर्यटन करतेवेळी स्थानिक लोकांच्या सूचना तंतोतंत पाळून आनंद लुटलात तर आपले पर्यटन नक्कीच संस्मरणीय ठरेल.