गुहागर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक विश्वास माने यांचे निधन
गुहागर : श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागरचे माजी मुख्याध्यापक व्ही. एस. मानेसर यांचे मंगळवारी रात्री 1.30 च्या सुमारास निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. दोन दिवसापूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने चिपळूण येथील खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्वात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
विश्वास माने सरांचे मुळगाव कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पिळवणी. मानेसर 1979 मध्ये गुहागर शहरातील श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर मध्ये इतिहास आणि भूगोल या विषयांचे शिक्षक म्हणून रुजू झाले. 1988 ते 1998 दरम्यानच्या काळात मानेसर गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापकही होते. 31 मे 2012 रोजी ते उपमुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले.
कडक शिस्तीचे भोक्ते असल्याने ते विद्यार्थिप्रिय नव्हते. पण विद्यार्थ्यांवर त्यांची माया होती. इतिहास शिकविण्याची त्यांची पद्धत विद्यार्थ्यांना प्रचंड आवडायची. त्यांच्या इतिहास शिकविण्याच्या पद्धतीमुळे मुलांना कधी सनावळ्यांची भिती वाटली नाही. दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाच्या परीक्षेची तयारी ते वर्गातच करून घेत असत. मानेसरांच्या शिकविण्याच्या पद्धतीमुळे इतिहास आणि भूगोल विषयाचे अपेक्षित संच कधी विद्यार्थ्यांना खरेदी करावे लागले नाहीत. शाळेच्या वेळेपूर्वी ते शाळेत येऊन व्हरांड्यात छडी घेऊन उभे असत. त्यामुळे उशिरा येणार्या विद्यार्थ्यांची वर्गात जाण्यापूर्वीच हजेरी होत असे. त्यामुळे त्यांचा दरारा होता. शाळा सुटल्यानंतर देखील वर्ग खोल्या झाडून झाल्यावर शिपायांबरोबर ते शाळेतून बाहेर पडायचे. शाळेतील स्वभाव आणि शाळेबाहेरील स्वभाव यात जमीनअस्मानाचे अंतर त्यांनी राखले. शाळेबाहेर विद्यार्थी भेटला तर मायाळू, चौकशी करणारे वडील त्यांच्यात दिसायचे. तर शिक्षकांसाठी ते शाळेबाहेर मित्र होते.
उत्तम प्रशासक अशी त्यांची गुहागर तालुक्यातील शाळांमध्ये ओळख होती. कायद्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट झालीच पाहिजे हा त्यांचा आग्रहाचा मुद्दा होता. मुख्याध्यापक असताना अनेकवेळा विद्यार्थी आणि शिक्षक यांना वेगळे काही करायचे असेल तर ती कल्पना ते लिहून द्या असे सांगत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट लिहून मागणारे मुख्याध्यापक अशीही त्यांची ओळख बनली होती. त्यामुळे काहीजण त्यांच्यावर नाराज असायचे. पण लिहून मागितले की नियोजन करता येते, समोरची व्यक्ती जे लिहून देते तेच करावे लागते, चुकीचे असेल तर बदल करता येतो. म्हणून जे मनात आहे ते कागदावर उतरवा. लेखी दिल्यामुळे आपणही त्या गोष्टीला बांधील रहातो. असा त्यांचा आग्रह असायचा. शाळेत होणार्या कोणत्याही कार्यक्रमाचे दोन दिवस आधी ते नियोजन करायचे. जबाबदारी वाटून द्यायचे. त्यामुळे कार्यक्रम वेळेवर, धावपळ न करता पार पडायचा. शाळा समूह योजनेअंतर्गत अनेक विचारवंतांची व्याख्याने त्यांनी शाळेत आयोजित केली. संपूर्ण शाळेला शिस्त लावणारा, उत्तम प्रशासक म्हणून ओळख असलेले मानेसर आज काळाच्या पडद्याआड निघून गेले आहेत.