गुहागर तालुक्यातील एनरॉन विरोधी लढ्याला स्वदेशी जागरण मंचाच्या माध्यमातून संघ परिवाराची ताकद जोडणारे सुरेंद्रजी थत्ते यांचे शुक्रवारी ता. 27 रोजी रात्री एकच्या सुमारास नाशिक येथे निधन झाले. वीज कंपनी विरोधी संघर्ष समितीच्या वतीने त्यांनी 1990 मध्ये गुहागर विधानसभा मतदार संघातून निवडणूकही लढवली होती. मुंबईत बोरिवली येथे वास्तव्यास असणारे सुरेंद्र थत्ते गेली काही महिने नाशिक येथे रहात होते. सुरेंद्र थत्ते यांच्यावर शनिवारी नाशिक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी सुहास, मुलगा मिलिंद, मुलगी जानव्ही, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
थत्ते कुटुंबीय मूळचे चिपळूण येथील आहे. सुरेंद्र थत्ते मुंबई गिरगाव येथील ठाकूरद्वार मंडलाचे ते स्वयंसेवक होते. घरात रा. स्व. संघाचे वातावरण असल्याने बालपणापासून संघ शाखेशी ते जोडले गेले होते.
कऱ्हाड आणि पुणे येथे सुरेंद्र थत्ते यांनी आपले शिक्षण पूर्ण केले होते. पुणे विद्यापीठातून टेलिकॉम विषयातील अभियांत्रिकी पदवी ( B.E.Telecom) त्यांनी प्राप्त केली होती. टीआयएफआर ( TIFR ) मध्ये त्यांनी काही काळ सायंटिकफिक अधिकारी म्हणून नोकरी केली होती. ती स्थिर, चांगल्या वेतनाची नोकरी सोडून सुरेंद्र थत्ते यांनी संघ प्रचारक म्हणून काही काळ काम केले होते. प्रचारक म्हणून थांबल्यावर मुंबईत गिरगाव येथे स्वतःचा सु-भास्कर या नावे अभियांत्रिकी व्यवसाय सुरू केला होता.
गीरगावकार चाळीत वास्तव्यास असणारे सुरेंद्र थत्ते आणीबाणीत शेवटपर्यंत भूमिगत राहून मुंबईत लोकशाहीच्या रक्षणाचा लढा देण्यात सक्रिय होते. सुरेंद्र थत्ते यांच्या आई माई यांनी आणीबाणीत कारावास भोगला होता. सुरेंद्र थत्ते यांच्या पत्नी सुहास यांनी घर, व्यवसाय या दोन्ही आघाडी सांभाळून मोलाची साथ दिली होती.
मुंबई महानगराच्या आणि महाराष्ट्र प्रांताच्या रा. स्व.संघाच्या कामात सुरेंद्र थत्ते यांचे भरीव योगदान राहिले आहे. महाराष्ट्र प्रांत महाविद्यालयीन प्रमुख आणि सहकार्यवाह म्हणून सुरेंद्र थत्ते यांनी काम केले आहे. लालकृष्ण अडवाणी यांच्या ऐतिहासिक रथयात्रेचे महाराष्ट्र राज्यातील संघटनात्मक प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
स्वदेशी जागरण मंचाचे काम महाराष्ट्रात विस्तारण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. 1990 च्या दशकात तत्कालीन एन्रॉन विरोधी लढ्यात अग्रणी होते. एन्रॉन विरोधी लढा हिंसक न होता विधायक मार्गाने नेण्यासाठी ते आग्रही होते. एन् राँन विरोधी लढ्याचा आवाज बळकट व्हावा, विधानसभेत प्रकल्प ग्रस्तांच्या समस्या मांडल्या गेल्या पाहिजेत म्हणून 1990 ची विधानसभा निवडणूकही गुहागर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी लढवली.
सुरेंद्र थत्ते कल्पक, सृजनशील होते. हजरजबाबी आणि मिश्किल स्वभावाचे सुरेंद्र थत्ते यांची बौद्धिक सोपी आणि कार्यकर्त्याला प्रेरणा देणारी असत. सामान्य व्यक्तीला सलगी देऊन त्याला संघटनेच्या कामात सहजपणे जोडण्याचे सुरेंद्र थत्ते यांचे कौशल्य होते.
विविध सामाजिक प्रकल्पांना सढळ हस्ते मदत करणाऱ्या सुरेंद्र थत्ते यांनी काही हुशार, होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मदत केली आहे. ही सगळी मदत कुठलाही गाजावाजा न करता, कर्तव्य बुद्धीने आणि सहृदयतेने केली आहे.