गुहागर : गुहागर शहराचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी अखेर शहर विकास आघाडीची झुल उतरवून स्वपक्षाचा झेंडा पुन्हा खांद्यावर घेतला. तसेच काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष प्रदिप बेंडल यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार आणि जिल्हा उपाध्यक्ष सहदेव बेटकर देखील उपस्थित होते. त्यामुळे वर्षभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा गतिमान होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तालुका कार्यकारणी बैठक शुक्रवारी ६ नोव्हेंबरला झाली.या बैठकीचे अध्यक्ष नवनिर्वाचित तालुकाधक्ष श्री. राजेंद्र आरेकर होते. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व जिल्हा उपाध्यक्ष श्री. सहदेव बेटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष श्री. पद्माकर आरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष श्री. रामचंद्र हुमणे गुरुजी उपस्थित होते.
मागील काही वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसपासून लांब असणारे शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष श्री. राजेश बेंडल हे आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय झाले. इथून पुढे आपण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच गुहागर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री. प्रदीप बेंडल यांनी देखील आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. या वेळी गुहागर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
शहर विकास आघाडीच्या स्थापनेपासून ते राजेश बेंडल यांना नगराध्यक्ष पदी बसविण्यापर्यंतच्या प्रवासात पडद्याआड राहून प्रदिप बेंडल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. काँग्रेस आय पक्षाला देखील गुहागर तालुक्यात बळ देण्याचे काम त्यांनी केले. पण काँग्रेसच्या नेतृत्वाने म्हणावे तसे पाठबळ प्रदिप बेंडल यांना दिले नाही. त्यामुळे अखेर त्यांनी राष्ट्रवादीत सक्रिय होण्याचा निर्णय घेतला असावा. राजेश बेंडल पुन्हा पक्षात सक्रिय झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते पुन्हा सक्रीय होतील. आजची कार्यकारणीची बैठक गुहागर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला नवसंजीवनी देणारी ठरेल.