श्रीकृष्ण वणे : गुहागरमध्ये ओबीसी समाजाचा आक्रोश मोर्चा
गुहागर, ता. 03 : ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी आम्ही राज्य सरकारपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत निवेदने दिली. आज राज्यातील प्रत्येक तहसीलदारांना आपण भेटतो आहोत. हिवाळी अधिवेशनातही आंदोलन करणार आहोत. तरीदेखील सरकारला जाग आली नाही तर रस्त्यावर उतरुन ओबीसी समाज संघर्ष करेल. असे प्रतिपादन कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण वणे यांनी केले. ते गुहागरमधील आक्रोश मोर्चात बोलत होते.
[bsa_pro_ad_space id=1]
गुहागर तालुक्यातील ओबीसी वर्गातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आज बसस्थानक ते तहसीलदार कार्यालय आक्रोश मोर्चा काढला. तहसील कार्यालयासमोर या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. या सभेचे प्रास्ताविक करताना गुहागर तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक पांडुरंग पाते यांनी ओबीसी समाजाच्या ११ मागण्यांची माहिती उपस्थितांना दिली. ओबीसी समाजाचा संघर्ष इतरांच्या विरोधात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष वणे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर होणारा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही. आज ओबीसी समाज जागा झाला नाही तर त्यांची मोठी किंमत पुढच्या पिढीला चुकवावी लागेल. येऊ घातलेली जनगणना जातिनिहाय करा. त्यानंतर आरक्षणाची पुर्नरचना करा. भंडारी समाजाचे उपाध्यक्ष नीलेश सुर्वे म्हणाले की, आज देशात 52 टक्के ओबीसी असून त्यामध्ये 350 पेक्षा अधिक जातींचा समावेश आहे. आम्हाला केवळ 19 टक्के आरक्षण हा अन्याय आहे. येणारी जनगणना जातिनिहाय व्हावी असे वाढत असेल तर ओबीसी समाजाने प्रत्येक ग्रामसभेत तसा ठराव करावा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर यांनी देखील ओबीसी घटकांना न्याय देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विनाविलंब कार्यवाही करावी. असे सांगितले.
गुहागर तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार सौ. लता धोत्रे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ओबीसी मंत्री आदींना देण्यासाठीची निवेदने त्यांच्याकडे सोपवली. यावेळी गुहागर तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक पांडुरंग पाते, जि.प. उपाध्यक्ष महेश नाटेकर, जि.प.सदस्या सौ. नैत्रा ठाकूर, गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, ओबीसीमधील सर्व ज्ञाती संस्थांचे प्रमुख पदाधिकारी, तालुक्यातील सर्व पक्षातील ओबीसी पदाधिकारी आदी उपस्थित होते.
